इजिप्त व जॉर्डनविरुद्ध 5, 8 एप्रिल रोजी होणार मैत्रिपूर्ण लढती, भारतीय महिला फुटबॉल संघाचे जॉर्डनमध्ये दोन सामने
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील महिन्यात भारताच्या महिला फुटबॉल संघाचे दोन आंतरराष्ट्रीय मित्रत्वाचे सामने इजिप्त व जॉर्डनविरुद्ध होणार असल्याचे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने (एआयएफएफ) सोमवारी जाहीर केले.
दोन्ही सामने जॉर्डनमध्येच होणार असून 5 एप्रिल रोजी इजिप्तविरुद्ध व 8 एप्रिल रोजी जॉर्डनविरुद्ध हे सामने होतील, असेही एआयएफएफने सांगितले. यानंतर सर्व खेळाडू मायदेशात होणाऱया इंडियन वुमेन्स लीग (आयडब्ल्यूएल) स्पर्धेत खेळण्यासाठी आपापल्या क्लबमध्ये दाखल होतील. प्रमुख प्रशिक्षक थॉमस डेनरबी यांच्या मार्गदर्शनाखाली 30 सदस्यीय संघाचे गोव्यामध्ये सोमवारपासून शिबिर सुरू झाले असून येत्या शनिवारी भारतीय महिला संघ जॉर्डनकडे रवाना होणार आहे. गेल्या आठवडय़ात भारतीय महिलांनी यू-18 सॅफ फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यावेळी संघासोबत प्रशिक्षक डेनरबी होते. अस्तम ओरॉन, अपूर्णा नारझरी, मार्टिना थॉकचोम या यू-18 संघातील खेळाडूंनाही या राष्ट्रीय शिबिरासाठी निवडण्यात आले आहे. गेल्या जानेवारी-फेब्रुवारीत भारताने एएफसी महिला आशियाई चषक स्पर्धेचे आयेजन केले होते. पण बायोबबलमध्ये असूनही भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे 11 जणांचा संघ मैदानात उतरवू न शकल्यामुळे भारताला या स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले होते.
भारतीय महिला संघ ः गोलरक्षक-अदिती चौहान, लिनथोइनगम्बी देवी, श्रेया हुडा, सौम्या नारायणसामी. बचावफळी-दलिमा छिब्बर, स्वीटी देवी, रितू रानी, आशालता देवी, रंजना चानू, मनीषा पन्ना, अस्तम ओरॉन, कृतिना देवी. मध्यफळी-अंजू तमंग, संध्या रंगनाथन, कार्तिका अंगामुथू, रत्नबाला देवी, प्रियांगका देवी, काश्मिना, इंदुमती कथिरेसन, संजू, मार्टिना थॉकचोम, सुमित्रा कामराज. आघाडी फळी-अपूर्णा नारझरी, ग्रेस दांगमेई, सौम्या गुगुलोथ, मनीषा, प्यारी झाझा, रेणू, करिश्मा शिरवईकर, मरियम्मल बालामुरुगन.