शेवटच्या सराव सामन्यात विंडीज महिला संघाला 81 धावांनी नमवले,
रंगिओरा-न्यूझीलंड / वृत्तसंस्था
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उंबरठय़ावर आयोजित शेवटच्या सराव सामन्यात भारतीय महिला संघाने विंडीजवर 81 धावांनी एकतर्फी विजय नोंदवला. सलामीवीर स्मृती मानधनाच्या 67 चेंडूत 66 धावांच्या धमाकेदार खेळीसह भारताने निर्धारित 50 षटकात सर्वबाद 258 धावा केल्या तर प्रत्युत्तरात विंडीजला 9 बाद 177 धावांवर समाधान मानावे लागले.
यापूर्वी, रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाच्या पहिल्या सराव सामन्यात डोक्यावर आघात सोसावा लागल्यानंतर स्मृती मानधना वैद्यकीय निरीक्षणाखाली होती. मात्र, त्या दुखापतीतून आपण पूर्ण सावरले असल्याचा दाखला देत स्मृतीने येथे दमदार फलंदाजी साकारली. भारताने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामन्यात 2 धावांनी निसटता विजय संपादन केला होता.
2017 मध्ये अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱया भारताची विंडीजविरुद्ध शेवटच्या सराव सामन्यात खराब सुरुवात झाली. चिनेली हेन्रीने शफाली वर्माला शून्यावर त्रिफळाचीत करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर स्मृती मानधनाच्या साथीला दीप्ती शर्मा क्रीझवर आली आणि या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 117 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. या जोडीने षटकामागे 6 धावांची सरासरी राखताना स्ट्राईक रोटेट करण्यावर अधिक भर दिला.
बहरातील स्मृती मानधनाने 67 चेंडूत 66 धावा फटकावताना 7 चौकार फटकावले. नंतर चेरी-ऍन प्रेझरने आपल्याच गोलंदाजीवर परतीचा झेल टिपत तिची खेळी संपुष्टात आणली. दीप्तीने 64 चेंडूत 51 धावांची लक्षवेधी खेळी साकारली. तिने एकेरी-दुहेरी धावांवर अधिक लक्ष केंद्रित केले होते. दीप्तीच्या या अर्धशतकी खेळीत केवळ एका चौकाराचा समावेश राहिला. तिला प्रेझरने बाद केले, त्यावेळी भारताची 27 षटकात 3 बाद 142 अशी स्थिती होती.
कर्णधार मिताली राजने 42 चेंडूत 4 चौकारांसह 30 धावा केल्या तर यास्तिका भाटियाने 53 चेंडूत 42 धावांचे उपयुक्त योगदान दिले. भाटियाच्या खेळीत 5 चौकारांचा समावेश राहिला.
विंडीजची खराब सुरुवात
विजयासाठी 259 धावांचे आव्हान असताना विंडीजचे पहिले 4 फलंदाज अवघ्या 53 धावांमध्ये तंबूत परतले आणि यात कर्णधार स्टेफानी टेलरचा (8) देखील समावेश राहिला. यष्टीरक्षक शेमेन कॅम्पबेलेने 81 चेंडूत सर्वाधिक 63 धावांचे योगदान दिले तर हेलेय मॅथ्यूजने 61 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले. विंडीजच्या अन्य फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली आणि त्यानंतर हा संघ विजयापासून कित्येक कोस दूर राहिला.
भारतीय संघातर्फे पूजा वस्त्रकार सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 7 षटकात 21 धावात 3 बळी असे लक्षवेधी पृथक्करण नोंदवले. याशिवाय, मेघना सिंग व दीप्ती यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. अनुभवी झुलन गोस्वामी आपल्या लौकिकाला साजेसा मारा करताना 8 षटकात केवळ 14 धावा दिल्या. एकही बळी घेता आला नसला तरी तिचा मारा काटेकोर, नियंत्रित टप्प्यावर राहिला.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ ः 50 षटकात सर्वबाद 258 (स्मृती मानधना 66, दीप्ती शर्मा 51). विंडीज महिला संघ ः 50 षटकात 9 बाद 177 (शेमेन कॅम्पबेले 63, हेलेय मॅथ्यूज 44. पूजा वस्त्रकार 3-21).