डाँगेहेई (दक्षिण कोरिया)
महिलांच्या आशिया चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताने थायलंडवर 13 गोल नोंदवून शानदार विजयी सलामी दिली. रविवारी येथे झालेल्या सामन्यात भारताने थायलंडचा 13-0 असा दणदणीत पराभव केला. भारताच्या गुरजीत कौरने या सामन्यात 5 गोल नोंदविले.
सामना सुरू झाल्यानंतर दुसऱयाच मिनिटाला गुरजीत कौरने पेनल्टी स्ट्रोकवर भारताचे खाते उघडले. सातव्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल वंदना कटारियाने नोंदविला. 14 व्या मिनिटाला लिलिमा मिंझने भारताचा तिसरा गोल केला. पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताने तीन गोल केले. गुरजीत कौरने तसेच ज्योतीने पेनल्टी कॉर्नरवर प्रत्येकी एक गोल केला. भारताने यावेळी थायलंडवर 5-0 अशी आघाडी मिळविली होती. भारताचा सहावा मैदानी गोल रजविंदर कौरने केला. 24 व्या मिनिटाला गुरजीत कौरने संघाचा सातवा तर वैयक्तिक तिसरा गोल केला. भारताचा आठवा गोल लिलिमाने पेनल्टी कॉर्नरवर केला. 25 व्या मिनिटाला गुरजीत कौरने संघाचा नववा तर वैयक्तिक चौथा गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत भारताने थायलंडवर 9-0 अशीआघाडी मिळविली होती.
सामन्यांच्या उत्तरार्धात भारताने 4 गोल केले. 36 व्या मिनिटाला ज्योतीने भारताचा दहावा गोल नोंदविला. 43 व्या मिनिटाला भारताचा 11 वा गोल सोनिकाने नोंदविला. 55 व्या मिनिटाला भारताचा 12 वा गोल मोनिकाने नोंदविला. 58 व्या मिनिटाला गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरवर भारताचा 13 वा तसेच वैयक्तिक पाचवा गोल नोंदवून थायलंडचे आव्हान संपुष्टात आणले. या सामन्यात कर्णधार राणीला विश्रांती देण्यात आली होती. गोलरक्षक सविताकडे नेतृत्व सोपविण्यात आले होते.