वृत्तसंस्था/ मेलबर्न
येत्या डिसेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार असून ऑस्ट्रेलियाने चार केंद्रे या कसोटी मालिकेसाठी निश्चित केली आहेत. यातील पहिली कसोटी 3 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू होणार असल्याचे वृत्त स्थानिक मीडियाने दिले आहे.
7 न्यूज डॉट कॉम व सिडनी मॉर्निंग हेराल्डने या संदर्भात वृत्त दिले आहे. चार सामन्यांच्या या मालिकेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून शुक्रवारी त्याची अधिकृत घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख कार्यकारी केविन रॉबर्ट्स करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वेळापत्रकात क्वारन्टाईन केंद्राबाबत मात्र काहीच तपशील देण्यात आलेला नाही. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी या दौऱयाचे वेळापत्रक निश्चित केले असून 3 डिसेंबरला ब्रिस्बेनमधील कसोटीने त्याची सुरुवात होईल. 11 डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये दुसरी कसोटी झाल्यानंतर मेलबोर्न व सिडनी येथे पारंपरिक पद्धतीने बॉक्सिंग डे (26 डिसेंबर) व न्यू ईयर (3 जानेवारी) कसोटी आयोजित करण्यात येईल,’ असे 7 न्यूज डॉट कॉमने म्हटले आहे. यातील ऍडलेड येथे होणारी दुसरी कसोटी डे-नाईट खेळविली जाण्याची अपेक्षा आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी डे-नाईट कसोटी खेळण्यास याआधीच मान्यता दिलेली आहे.
सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अफगाणविरुद्धच्या पर्थमधील पिंकबॉल कसोटीने ऑस्ट्रेलियन उन्हाळी मोसमाची सुरुवात होईल तर ब्रिस्बेनमधील कसोटीने भारताची महत्त्वाची मालिका सुरू होईल. 2020-21 या मोसमासाठीचे वेळापत्रक शुक्रवारी सीए जाहीर करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियात कोव्हिड 19 चार जोर कमी होत चालला असल्याने या दौऱयावेळी क्वारन्टाईनची गरज लागणार नाही, असे सीएला वाटत असावे. एकाच केंद्रावर सर्व सामने होण्याची शक्यताही 7 न्यूजने व्यक्त केली आहे. या सामन्यांना प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार का, किती जणांना प्रवेश देणार, असे प्रश्नही या साईटने उपस्थित केले आहेत.