रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांची सूचना : गरीब देशांना लाभ होणार
कोरोना विषाणूवरील लस विकसित करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे आवाहन रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी केले आहे. चीन आणि भारतात रशियाच्या स्पुतनिक-5 लसीचे उत्पादन केले जाऊ शकते, अशी सूचना पुतीन यांनी यावेळी केली आहे.
रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने ब्राझील आणि भारतीय भागीदारासोबत या लसीच्या क्लीनिकल ट्रायलसाठी करार केला आहे. या लसीचे उत्पादन सुरू करण्यासाठी चीन आणि भारतात औषध कंपन्यांसोबत करारही झाला आहे. या करारांमुळे गरीब आणि विकसनशील देशांनाही लाभ होणार असल्याचा दावा पुतीन यांनी ब्रिक्स शिखर परिषदेला संबोधित करताना म्हटले आहे.
92 टक्के प्रभावी
11 ऑगस्ट रोजी रशिया कोरोनावरील लसीची नोंदणी करणारा जगातील पहिला देश ठरला होता. गामालेया रिसर्च इन्स्टीटय़ूटने ही लस विकसित केली आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड विदेशात लसीचे उत्पादन तसेच त्याच्या वापराला चालना देत आहे. स्पुतनिक-5 लस कोरोनाला रोखण्यास 92 टक्के उपयुक्त असल्याची घोषणा रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने मागील आठवडय़ात केली होती. या लसीसंदर्भात अनेक शंका उपस्थित होत आहेत.