वृत्तसंस्था/ लखनौ
यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील दुसरा वनडे सामना मंगळवारी येथे खेळविला जाणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाला विजयाची नितांत गरज आहे. या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार मंगळवारी सकाळी 9 वाजता प्रारंभ होईल.
या मालिकेतील रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 8 गडय़ांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. पहिल्या सामन्यात भारताची सर्वच विभागातील कामगिरी निकृष्ट झाल्याने मिथाली राजच्या नेतृत्वाखालील महिला क्रिकेट संघाला आता मंगळवारच्या सामन्यात आपल्या कामगिरीत सुधारणा करावीच लागेल. भारताची फिरकी गोलंदाजी पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना त्रास देवू शकली नाही. अनुभवी झुलन गोस्वामी, हरमनप्रित कौर, कर्णधार मिथाली राज, स्मृती मंदाना, दिप्ती शर्मा, पुनम राऊत यांच्या कामगिरीवरच भारतीय संघाचे यश अवलंबून राहील. हरमनप्रित कौरचा 100 वा वनडे सामना रविवारी झाला पण तिला मोठी धावसंख्या रचता आली नाही. स्मृती मंदाना लवकर बाद झाली. मंगळवारच्या सामन्यात भारतीय संघाला बरोबरी करण्याची संधी आहे पण दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा आत्मविश्वास पहिल्या सामन्यातील विजयामुळे निश्चित वाढला असल्याने आता हा संघ मालिकेतील आपली आघाडी वाढविण्याचा प्रयत्न करेल. या दुसऱया सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारतावर विजयासाठी अधिक दडपण राहील. या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरू शकेल. दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम इस्माईलने पहिल्या सामन्यात भेदक गोलंदाजी करत भारताच्या अनुभवी फलंदाजांना लवकर बाद केले होते. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघ आपले अंतिम 11 खेळाडू जाहीर करतील.