प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापुरात बुधवारी देशव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद काळात विविध संघटनांनी विविध मागण्यांसाठी मोर्चे काढले. बुधवारी दिवसभरात 10 मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. त्यामुळे बुधवार ‘मोर्चावार’ ठरला. जिल्हय़ात या पार्श्वभूमीवर 2 हजार पोलीस, दीड हजार होमगार्डचा बंदोबस्त ठेवला होता. कामगारविरोधी, शैक्षणिक मागण्यांसाठी, नागरिकत्व विरोधात अशा विविध विषयांवर निघालेल्या मोर्चामुळे शहरात वाहतुकीच्या कोंडीचे चित्र पहायला मिळाले.
कोल्हापुरात बुधवारी जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, केंद्रीय कर्मचारी संघटना, अखिल भारतीय राज्य कर्मचारी संघटना, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राज्य चतुर्थ शेणी कर्मचारी संघटना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी महासंघ, आशा संघटना, अंगणवाडी सेविका संघटना आदी संघटनांनी कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ विविध मागण्यांसाठी मोर्चे काढले. कोल्हापूर हमाल पंचायतीने लाक्षणिक संपात सहभागी होत जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. बहुजन क्रांती मोर्चाने नागरीकत्वाविरोधात मोर्चा काढला. टाऊन हॉल ते बिंदू चौक आणि बिंदू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, टाऊन हॉल ते जिल्हा परिषद कार्यालय या मार्गावर हे मोर्चे निघाल्याने वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.