लॉकडाऊनमुळे पर्यटकांवर निर्बंध आल्याने महसूल ठप्प : दैनंदिन खर्चाचा प्रश्न गंभीर, दत्तक योजनेसाठी प्राणीप्रेमींना आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे. याला प्राणी संग्रहालयदेखील अपवाद नाही. भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे पर्यटकांवर निर्बंध आल्याने महसूल पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळे प्राणी संग्रहालयासमोर दैनंदिन खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर विकास साधण्यात येत असलेल्या भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात तीन सिंह, दोन वाघ, दोन बिबटे व तीन कोल्हे दाखल झाले आहेत. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या परवानगीनुसार संग्रहालयात दाखल झालेल्या वन्यप्राण्यांना काही दिवस क्वारंटाईन करून पर्यटकांना खुले करण्यात येत होते. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घातल्याने संग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे महसूल थांबला आहे. बेंगळूर येथील बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्कमधून तीन सिंह, म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयातून दोन वाघ, इतर ठिकाणाहून तीन बिबटे व दोन कोल्हे दाखल झाले आहेत. जंगलाच्या राजासह इतर प्राण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच लॉकडाऊनमुळे पर्यटकांची पावले थांबल्याने उत्पन्नही शून्यावर आले आहे. दरम्यान, प्राण्यांच्या खाण्या-पिण्याचा खर्च वाढला आहे. या प्राण्यांना मोठय़ा प्रमाणात मांसाची गरज असते. त्यामुळे खर्चदेखील अधिक आहे. त्यामुळे समाजातील प्राणीप्रेमींनी दत्तक योजनेंतर्गत प्राण्यांच्या देखभालीसाठी मदत करावी किंवा एखादा प्राणी दत्तक घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यटकांच्या माध्यमातून दररोज 20 ते 25 हजार रुपये उत्पन्न मिळत होते. मात्र, मागील महिन्याभरापासून प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद झाल्याने पर्यटकांच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्नही थांबले आहे. शिवाय शासनाकडून मिळणारे अनुदानही कमी झाल्याने प्राणी संग्रहालयाच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे वन्यप्राण्यांच्या संवर्धन व संरक्षणासाठी वनविभाग कसोशीने प्रयत्न करत आहे. दुसरीकडे भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयातील वन्यप्राण्यांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाचा विकास साधण्यात येत आहे. या निसर्गधामाचे मिनी प्राणी संग्रहालयात रुपांतर झाले असून या ठिकाणी वन्यप्राण्यांची व्यवस्था व्हावी, याकरिता नियोजनबद्ध बांधणी करून निवारा शेडची उभारणी करण्यात आली आहे. वन्यप्राण्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या असून येत्या काळात चित्ता, अस्वल, गवीरेडे, हरिण व इतर प्राणीदेखील दाखल होणार असून लॉकडाऊनमुळे या प्राण्यांची एन्ट्री लांबणीवर पडली आहे. याशिवाय पक्षी ठेवण्यासाठी विशेष खोल्यांची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच विविध जातीचे पक्षीही दाखल होणार आहेत.
दानशूर व्यक्ती-प्राणीप्रेमींनी प्राण्यांना दत्तक घेणे गरजेचे
मागील महिन्याभरापासून पर्यटकांवर निर्बंध आल्याने महसूल थांबला आहे. त्यामुळे सिंह, वाघ, बिबटे व कोल्हे यांचा दैनंदिन खर्च भागविणे मुश्कील झाले आहे. त्यांच्या खाण्या-पिण्याबरोबर देखभालीचा खर्च मोठा असतो. त्यामुळे या प्राण्यांच्या देखभालीसाठी दत्तक योजना राबविण्यात आली आहे. समाजातील दानशूर व्यक्ती आणि प्राणीप्रेमींनी पुढे येऊन प्राण्यांना दत्तक घ्यावे. दरम्यान, देखभालीसाठी पंधरा जण काम करत आहेत. खबरदारी म्हणून संपूर्ण प्राणी संग्रहालयात दररोज सॅनिटायझर करण्यात येत आहे.
राकेश अर्जुनवाड (आरएफओ भुतरामहट्टी)
वन्यप्राणी | वन्यप्राण्यांची संख्या |
सिंह | 3 |
वाघ | 2 |
बिबटे | 3 |
कोल्हे | 2 |