प्रतिनिधी / गारगोटी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत भुदरगड पंचयात समितीच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या भुदरगड महोत्सवला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्दघाटन झाले. सभापती किर्ती देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
भुदरगड पंचायत समितीच्या आवारात महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन या तालुकास्तरीय महोत्सवाचे आयोजन केले आहे. आज पहिल्याच दिवशी महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येेने हजेरी लावली. यामुळे बचत गटांच्या स्टॉलवर मोठी आर्थिक उलाढाल झाली. सुगरण स्टॉलवर फराळाच्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली. याचबरोबर टाकाऊ वस्तू पासून बनविलेल्या टिकाऊ वस्तू, सेंद्रीय उत्पादने, मातीचा फ्रीज व मातीच्या वस्तू, पाटगावची पळपट लाटणे, बांबूपासून बनविलेल्या वस्तू, वडा–कोंबड्यापासून विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले होते.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ग्रामीण महिलांच्या कला–गुणांना व कौशल्यांना वाव देण्यासाठी त्यांना आर्थिक दुष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी बचत गटांची भुमिका महत्सवाची आहे. पंचायत समितीने या महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
यावेळी उपसभापती सुनिल निंबाळकर, माजी सभापती बाबा नांदेकर, सदस्या सरिता वरंडेकर, आक्काताई नलवडे, स्नेहल परीट, संग्रामसिंह देसाई, अजित देसाई, धनाजी खोत, कक्ष अधिकारी कांचन भोईटे आदी उपस्थित होते.