रविवार अन् शनिवारी अधिक तीव्रतेचे भूकंप : देशात 140 जण जखमी
वृत्तसंस्था/ फुकुशिमा
जपानमध्ये शनिवारी बसलेल्या अधिक तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानंतर रविवारी पुन्हा याचे धक्के जाणवले आहेत. जपानच्या हवामानशास्त्र संस्थेनुसार रविवारी जाणवलेले भूकंपाचे धक्के फुकुशिमा भागातच नोंद करण्यात आले आहेत. रविवारच्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी होती. भूकंपाचे नवे धक्के पहाटे 04.13 वाजता जाणवले आहेत. भूकंपानंतर त्सुनामीचा कुठलाच धोका नसल्याचे सांगण्यात आले.
भूकंपाचे केंद्र जमिनीत 50 किलोमीटर खोलवर होते. फुकुशिमा आणि मियागी प्रांतांच्या अन्य हिस्स्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शनिवारी रात्री बसलेल्या 7.1 तीव्रतेच्या भूकंपामुळे जपानच्या फुकुशिमा, मियागी समवेत अनेक भागांमध्ये खळबळ उडाली होती.
फुकुशिमा प्रांतातील भूकंपामुळे तेथील आण्विक ऊर्जा संयंत्रांना कुठलेच नुकसान पोहोचले नसल्याचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी रविवारी सांगितले आहे. शनिवारच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे 140 जण जखमी झाले आहेत. भूकंपाचे धक्के टोकियोतही जाणवले आहेत. शनिवारच्या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली 54 किलोमीटरवर होते.
देशातील बहुतांश लोक झोपेत असताना शनिवारी रात्री 11.08 वाजता भूकंपाचा अधिक तीव्रतेचा धक्का बसला होता. मार्च 2011 मध्ये त्सुनामीचे संकट झेललेल्या क्षेत्रातच हा धक्का जाणवला. भूकंपामुळे इमारती हलू लागल्याने भीतीपोटी लोक घरातून बाहेर पडले होते.