प्रतिनिधी / सांगली
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकामध्ये भूखंडाचे बाजार चाललेला आहे. त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभ करण्यासाठी शनिवारी सांगलीत कष्टकऱ्यांची दौलत येथे सर्वपक्षीय कृती समितीची व्यापक बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये कोरोनाकाळात झालेल्या ऑनलाइन महासभेत ज्या भानगडी घडलेले आहेत, त्या सर्व भानगडींचा विचार करता सर्वप्रथम ऑफलाईन सभा झाली पाहिजे, राज्य सरकार आमदारांचे अधिवेशन घेत असेल, तसेच संसदेचे अधिवेशन होत असेल तर सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेची सभा देखील ऑफलाईन झाली पाहिजे व भूखंडांचे चुकीचे विषय महासभेत घुसडण्यात आले आहेत. त्याला विरोध करण्यासाठी मंगळवार दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 1 महापालिकेच्या समोर धरणे आंदोलन देण्याचे ठरलेले आहे.
यावेळी वि. द. बर्वे, कॉ. शंकर पुजारी, माजी नगरसेवक गौतम पवार, माजी नगरसेवक हणमंतराव पवार, सतीश साखळकर, महेश खराडे, उमेश देशमुख, राजकुमार राठोड, डॉ. संजय पाटील, राहुल पाटील, आशिष कोरी, तोहिद शेख, तानाजी रुईकर, माजी नगरसेवक, शेरू भाई सौदागर, लालू मिस्त्री, किरण कांबळे, अविनाश जाधव, संतोष कदम आदी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.