सुरुर (ता.वाई) धावजी पाटील मंदिरातील प्रकार ; पोलिसांकडून धरपड सुरु
वार्ताहर/ भुईंज/कुडाळ
सुरूर (ता.वाई) येथील धावजी पाटील मंदिरात अघोरी कृत्य सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. अंगातील भूत उतरवण्याचा प्रकार एका मांत्रिकाकडून सुरू होता. हा मांत्रिक भूत लागलेल्या व्यक्तीस शिवीगाळ आणि मारहाण करत भीतीदायक वातावरण निर्माण तयार करत होता, तशी तक्रार दिल्यानंतर भुईंज पोलीस ठाण्यात मांत्रिकासह तीन जणांवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, सुरुर (ता.वाई) येथील धावजी बुवा मंदिरात अनेकजण भूत बाधा, लागीर लागणे, लग्न न जमणे आदी विविध कारणांसाठी मंदिरातील बुवाजवळ अनेकजण जात असतात. यावेळी डोक्यावर पांढरा कापडा बांधलेला लांब केस व लांब दाडी असलेल्या मांत्रिका समोर वयस्कर काळा सावळा पांढरा शर्ट घातलेला एक इसम त्याचेसमोर बसलेला होता. सदर इसमास जोर जोरात आरडाओरडा करून शिविगाळ करित विचित्र हावभाव करित होता. त्या इसमास हा मांत्रिक मारहाण करित होता. घाण घाण शिविगाळ करित असताना सदर इसमाचे तोडांवर लिंबू धरून लिंबुला टाचण्या टोचून मोठमोठय़ाने मंत्र म्हणून लिंबुला टाचणी टोचून लिंबुतून येणारे पाणी सदर इसमाचे तोंडात टाकत होता. सदर वयस्कर इसमाचे बाजुला बसलेली एक वयस्कर महिला तीचे गळ्यात कवडय़ाच्या माळा होत्या. सदर महिलेने त्या वयस्कर इसमाचे समोर जमीन वरील गोला आकारामध्ये गुलाल टाकून त्याचे मध्यभागी लिंबू ठेवून त्या इसमास हे झाड सोडायला तुला काय पाहिजे, असे म्हणून त्या वयस्कर इसमाचे पायावरील बारीक केस हाताने ओढत होती व तो इसम मोठ मोठय़ाने ओरडत होता.
सदर वयस्कर इसम तसेच मांत्रिक यांना गोल करुन तीन ते चार लोक बसलेले होते. पांढरा शर्ट घातलेला काळा सावळा इसमाचे भूत उतरविण्याचा अघोरीकृत्य तक्ररारदाराच्या मोबाईलमध्ये चित्रिकरण करण्यात आले आहे. त्या आधारावर भुईंज पोलिसांनी मांत्रिकासह तीन जणांविरुध्द जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांत्रिकाकडून अनेकांच्या फसवणूका
सुरुर येथील धावजी पाटील मंदिरात अनेक वर्षांपासून जादूटोणा करुन अनेक लोकांची फसवणूक केल्याची तक्रार भुईज पोलीस ठाण्यात पुणे येथील वकील मनोज माने यांनी केली होती. यावर अंधश्रद्धा निर्मूलनचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी देखील या ठिकाणी अनेक वर्षांपासून जादूटोणा करून लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू असल्याचे सांगितले होते. संबंधित मंत्रिकावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होता. त्यानुसार भुईंज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.