प्रतिनिधी / सावंतवाडी:
एक जबाबदार फार्मसिस्ट या नात्याने समाजाप्रती आपले कर्तव्य निभावत असताना सहनशीलता, चौकसपणा व सतत नवीन गोष्टी शिकण्याची ऊर्मी हे गुण खूप उपयोगी पडले. गेली 35 वर्षे सचोटीने केलेल्या कामाचे फळ म्हणजेच आज मिळालेला पुरस्कार होय, असे प्रतिपादन शिरोडा येथील फार्मसिस्ट कमरुद्दीन शेख यांनी केले.
येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे जागतिक फार्मसिस्ट दिनाचे औचित्य साधून शेख यांना ‘फार्मसिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आनंद रासम, बी. फार्मसी कॉलजेचे प्राचार्य डॉ. विजय जगताप, डी. फार्मसी प्राचार्य सत्यजीत साठे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. प्राचार्य डॉ. जगताप यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. साठे यांनी फार्मसिस्टची कर्तव्ये कोणती व कॉलेजमार्फत आजपर्यंत पुरस्कार दिलेल्या व्यक्तींची माहिती दिली.
आनंद रासम यांनी कोरोना साथीच्या काळात फार्मसिस्ट वर्ग देत असलेल्या योगदानाची माहिती दिली. पेशंट कौन्सिलिंग ही आपली महत्वपूर्ण जबाबदारी असून प्रत्येक फार्मसिस्टने ती योग्य तऱहेने पार पाडावी, असे आवाहन केले.
अच्युत सावंत-भोसले यांनी गुणवत्ता व शिस्त ही आपल्या संस्थेची दोन प्रमुख वैशिष्टय़े असून विद्यार्थ्यांना एक आदर्श फार्मसिस्ट कसा असतो, हे समजावे यासाठी फार्मसिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार सुरू केल्याचे सांगितले.
यावेळी कॉलेजच्या ‘फार्मांकुर’ या वार्षिकांकाचे आणि विद्यार्थी-शिक्षकांचे संशोधनपर लेख असणाऱया ‘सायंटिफिक ट्रेझर’ या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात आले. या अंकांची विस्तृत माहिती
प्रा. तुषार रुकारी यांनी दिली. या कार्यक्रमात झूम ऍप व यू टय़ुबद्वारे कॉलेजचे विद्यार्थी ऑनलाईन सहभागी झाले. कार्यक्रमाचे निवेदन प्रा.नमिता भोसले यांनी केले. तर आभार प्रा. महादेव परब यांनी मानले.