बळींची एकूण संख्या 116 : नवे रुग्ण 339 : 298 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी / पणजी
राज्यात मंगळवारी कोरोनामुळे पाच रुग्णांचा मृत्यू झाला. 339 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. 298 जण बरे झाले आहेत. एकूण बळींची संख्या 116 झाली असून 3861 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या 12333 झाली असून त्यातील 8356 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
संशयित रुग्ण म्हणून 95 जणांना गोमेकॉतील आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आले असून 231 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या बळींची व रुग्णांची संख्या वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यास सरकारी यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे समोर येत आहे.
काल मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झालेले पाच रुग्ण पुरुष असून या रुग्णांना गोमेकॉ आणि कोविड हॉस्पिटलात मरण आले. यात आके-बायश येथील 57 वर्षीय, मडगाव येथील 75 वर्षीय, बोरीतील 72 वर्षीय, फोंडातील 57 वर्षीय व बायणा-वास्कोतील 66 वर्षीय रुग्णाचा समावेश आहे.
विविध हॉटेल्स, रेसिडेन्सीमध्ये 36 जणांना क्वॉरंटाईन करून ठेवण्यात आले आहे. गोव्यात विविध मार्गाने आलेल्या तीन प्रवाशांना कोरोनाची बाधा झाली असून पाच प्रवाशांना होम क्वॉरंटाईन तर एका प्रवाशाला संस्थात्मक क्वॉरंटाईन केल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
फैलाव नियंत्रणात सरकार अपयशी
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना बळींची व बाधित रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकार अपयशी ठरत आहे. कोरोनाचे संकट वाढत असून पुढे ते कुठे पोहोचणार याचा अंदाज लावणे कठीण आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोविड हॉस्पिटल, सेंटरची संख्या वाढवण्यात येत आहे परंतु कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोणतेही उपाय आखले जात नाहीत. कोरोनाचे संकट आता जनतेवरच सोपविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोग्य केंद्रनिहाय कोरोना रुग्णसंख्या
डिचील – 26
सांखळी – 120
पेडणे – 171
वाळपई – 148
म्हापसा – 125
पणजी – 189
हळदोणा ö 47
बेतकी – 68
कांदोळी – 95
कासारवर्णे – 41
कोलवाळ ö 94
खोर्ली – 102
चिंबल – 223
शिवोली – 35
पर्वरी – 152
मये – 102
कुडचडे – 85
काणकोण ö 39
मडगाव – 519
वास्को – 365
बाळ्ळी – 34
कासावली – 107
चिंचिणी – 23
कुठ्ठळी ö 130
कुडतरी – 98
लोटली – 62
मडकई – 62
केपे – 90
सांगे – 58
शिरोडा – 64
धारबांदोडा – 117
फोंडा – 208
नावेली – 59
आतापर्यंतचे एकूण रुग्ण 12333
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 8356
18 ऑगस्ट रोजीचे नवे रुग्ण 339
18 ऑगस्ट रोजी बरे झालेले रुग्ण 298
सध्याचे सक्रिय रुग्ण 3861
18 ऑगस्ट रोजीचे मृत्यू 5
आतापर्यंतचे एकूण मृत्यू 116
माहिती खात्याचे कर्मचारी : धनंजय केरकर कोरोनाचे बळी
प्रतिनिधी / मडगाव
राज्य सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्यात सहाय्यक माहिती अधिकारी म्हणून काम करणारे कर्मचारी तसेच एक उत्कृष्ट नाटय़ व सिने कलाकार धनंजय गाड केरकर (57) यांनी काल मंगळवारी संध्याकाळी 3.45 वा. मडगावच्या कोविड हॉस्पिटलात अखेरचा श्वास घेतला. ते मुळचे केरी-फोंडा येथील असून सद्या ते वरचा बाजार फोंडा येथे राहत होते. त्यांच्या निधनाने मित्र परिवाराला जबरदस्त धक्काच बसला आहे.
धनंजय गाड केरकर यांना माहिती व प्रसिद्धी खात्यातच कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्याबरोबर या खात्यातील 15 कर्मचारी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. धनंजय गेले 15 दिवस कोरोनाशी लढा देत होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत विशेष अशी सुधारणा झालीच नाही. त्यांच्या पत्नी वरदा या देखील कोरोना पॉझिटिव्ह होत्या. त्यांनी कोरोनावर मात केली व नंतर त्या आपल्या पतीच्या सेवेसाठी कोविड हॉस्पिटलात दाखल झाल्या होत्या.
धनंजय यांना मधुमेह, रक्तदाब तसेच न्युमोनिया असे अन्य आजार होते अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांच्या पश्च्यात पत्नी वरदा (कुर्टी-फोंडा येथील कामाक्षी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका व कवयित्री) तसेच दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. धनंजय गाड केरकर यांनी प्रा. मिलिंद म्हाडगूत यांच्या काही टेलिफिल्मात तसेच नाटकांत अभिनय साकारला होता.
कोविड हॉस्पिटलात गेले चार बळी
मडगावच्या कोविड हॉस्पिटलात सोमवारी संध्याकाळी 4 वा. खारेबांद-मडगाव येथील 75 वर्षीय पुरूषाचा बळी गेला. तर मंगळवारी पहाटे 2.20 वा. बायणा-वास्को येथील 66 वर्षीय पुरूषाचा बळी गेला. त्यानंतर बोरी-फोंडा येथील 72 वर्षीय पुरूषाचा बळी गेला. मंगळवारी संध्याकाळी 3.45 वा. धनंजय गाड केरकर यांचा बळी गेला. त्यामुळे मंगळवारी फोंडा तालुक्यात एकाच दिवशी दोन बळीची नोंद झाली. सद्या मडगावच्या कोविड हॉस्पिटलात अतिदक्षता विभाग व आयटीयू विभाग रूग्णांनी भरलेला आहे. त्यातील काही जणांची प्रकृती नाजूक बनलेली आहे. तर 190 रूग्ण कोविड हॉस्पिटलात उपचार घेत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.