15 ऑगस्ट रोजी इस्पितळाचा पायाभरणी सोहळा : बेतकी खांडोळा पंचायतीत रू. 47 कोटींची विकासकामे
वार्ताहर /माशेल
प्रियोळ मतदासंघाचा चौफेर विकास कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या कणखर नेतृत्वामुळेच होत आहे. फक्त बेतकी पंचायत क्षेत्रात पंचवीस कोटी खर्चुन विकासकामे पुर्ण झालेली आहेत. तसेच रू. 22 कोटी खर्चुन बेतकी येथे सुसज्ज इस्पितळाची उभारणी होणार आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी पायाभरणी सोहळा होणार असल्याची माहिती काल बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून सरपंच दिलीप नाईक यांनी दिली.
यावेळी बेतकी खांडोळाच्या उपसरपंच अमिना वाडकर, पंचसदस्य मुक्ता नाईक, भावना नाईक, दर्शना विशांत नाईक उपस्थित होते. प्रियोळ मतदारसंघातून मंत्री गोविंद गावडे निवडणूकीत उतरले होते तेव्हाच बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट करणे हे प्रथमदर्शनी हेरले होते. बेतकी आरोग्य केंद सुसज्ज व्हावे अशी मागणी होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या सहकार्याने ती मागणी पुर्णत्वास येत आहे. त्या कामाचा शुभारंभ येत्या स्वातंत्र्यदिनी होणार आहे. रू. 22 कोटी खर्चुन सुसज्ज 25 खाटाचे इस्पितळ झाल्यानंतर येथील ग्रामिण भागातील लोकांना ते उपयुक्त ठरणार आहे. तसेच जुने इस्पितळाची इमारत ही ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करण्याचा मनोदय मंत्री गावडे यांनी व्यक्त केला आहे. जमीन हस्तांतरण प्रक्रियेसाठी बराच अवधी लागल्यामुळेच सदर प्रक्रियेला विलंब झाला. सद्यपरिस्थितीत दहा हजार चौ.मिटर जागा संपादन करण्यात आल्याची माहिती सरपंच दिलीप नाईक यांनी दिली होती.
खांडोळा उच्च माध्यमिकचसाठी नुतन इमारत
खांडोळा येथील उच्च माध्यमिक विद्यालयाची इमारत पुर्णपणे जीर्ण झाली असून त्याची पाहणी मंत्री व बेतकी पंचायत मंडळातर्फे करण्यात आलेली आहे.जीर्ण इमारत पाडल्यानंतर विद्यार्थ्यासाठी गैरसोय होऊ नये हे लक्षात घेत सदर इमारतीसाठी नवीन जागेची पाहणी करण्यात केलेली आहे. सर्व सोपस्कर पुर्ण झाल्यानंतर या कामाची सुरवात होणार आहे. तसेच जीर्ण इमारत जमिनदोस्त करून सदर जागेचा सुसज्ज मैदानात रूपांतर करण्यात येईल.
मागील आमदार निष्किर्य, विद्यमान आमदारांचा विकासकामाचा झपाटा
मागील आमदाराने केलेली कामे पुर्ण करण्यात विद्यमान आमदारांवर होणाऱया आरोपावर बोलताना ते म्हणाले की प्रियोळ मतदारसंघात सर्व पंचायतीने अनेक विकासकामांचे ठराव घेतले. त्याला माजी आमदारांनी कधीच चालना दिली नाही, असे कित्येक ठराव बेतकी खांडोळा पंचायतीनेही घेतले परंतू त्याला चालना त्याकाळी मिळालेली नसून त्य़ाकडे दुर्लक्ष करण्यात आले. मंत्री गोविंद गावडे विकासकामे तयार करा, पंचायतीतर्फे घेतलेल्या ठरावांना प्रोत्साहन देत ते मार्गी लावतात ते स्वतः हिरीरीने चौकशी करून ते पुर्ण करण्यावर लक्ष घालत आहेत. ते मागील आमदारांनी कधीच केले नाही.
बेतकी खांडोळय़ासह संपुर्ण प्रियोळ मतदारसंघाचा कायापालट
प्रियोळ मतदारसंघातील डागडुजी करण्यात आलेली प्राथमिक विद्यालये म्हणजे आज फोंडा तालूक्यातील सर्वात सुसज्ज विद्यालये आहेत. शौचालये, रस्ते, वीज, पथदिपांची सोय व गणेश विसर्जनस्थळाचे सुशोभिकरण केलेले आहे. अमेयवाडा बेतकी येथील शेतकऱयांचा जटील प्रश्न सोडविताना शेतीच्या पाणी वापरासाठी पंपहाऊस व शेतामधून रस्ते अशी प्रलंबित कामे पुर्णत्वास नेलेली आहे. संरक्षक भिंती व रस्त्याचे हॉटमिक्सिंगचाही समावेश आहे. त्याखेरीज भुमिगत वीजवाहिनीसाठी कायम प्रयत्नरत आहे, 11 केव्ही वीज पुरवठयामुळे अखंडीत वीज मिळवून दिलेली आहे.
स्वतःसह इतरांनाही नेतृत्वासाठी वाव देणारा नेता
मंत्री गावडे यांच्या कार्यकाळातच प्रियोळ मतदारसंघात आपल्याप्रमाणे उमेदवार तयार झाले असल्याचे ते म्हणाले. केवळ निवडणूकावेळी रिंगणात उतरले म्हणून लोक मते देत नसतात. आज मतदार सुज्ञ बनला असून विकासकामे बघतात. ज्या उमेदवारांने ग्रामिण भागातील सर्व समस्या सोडविण्याकडे तळमळ दाखविली त्याबाजूनेच मतदार राहतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्री गोविंद गावडे भाजपामध्ये दाखल झाल्यास त्याच्याबरोबर ठामपणे राहण्याचा व़िश्वास सरपंच दिलीप नाईक यांनी व्यक्त केला. प्रियोळ मतदारसंघात बेतकी पंचायत क्षेत्रातील ग्रामिण भागातील लोकांना वैद्यकीय सेवा दारापर्यंत पोचविण्यासाठी इस्पितळ उभारणीसाठी घेतलेले पाऊल म्हणजे मैलाचा दगड ठरतील असे सांगितले. कोरोनाच्या सावटातून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबतही बेतकी खांडोळा पंचायत अग्रेसर मंत्री गोविंद गावडे यांच्या जागृतीमुळेच झाल्याचे सरपंच दिलीप नाईक म्हणाले.