मऱयाम्मादेवी मंदिराचा आज भूमिपूजन समारंभ
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर शहराच्या ग्रामदेवतापैकी एक असलेल्या मऱयाम्मादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सदर मंदिर बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावर हलकर्णी नजीक असून नियोजित मंदिराची प्रतिकृती असलेल्या डिजिटल फलकाचे अनावरण रविवारी खानापूर को-ऑप. बँकेचे ज्येष्ठ संचालक कृष्णा अंबाजी खानापुरी यांच्या हस्ते करण्यात
आले.
प्रारंभी त्यांच्याच हस्ते मऱयाम्मा देवीची पूजा करण्यात आली. तसेच जीर्णोद्धाराचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी मऱयाम्मा देवीला साकडे घालण्यात आले. यावेळी कृष्णा खानापुरी यांनी सदर मंदिराचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपल्यापरीने सर्वप्रकारचे सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच जीर्णोद्धारासाठी आपली 51 हजार रु. ची देणगी जाहीर केली.
तसेच नारायण देवाप्पा घाडी यांनी देखील नियोजित मंदिराच्या गाभाऱयासाठी लागणाऱया दगडी चौकटीसाठी 51 हजार रु. देण्याचे जाहीर केले. या मंदिराचा आराखडा सुप्रसिद्ध आर्कीटेक्ट जयपाल गुंजीकर यांनी तयार केला आहे. आता या मंदिराचा भूमिपूजन व पायाखोदाई समारंभ सोमवार दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
विविध कामांचा शुभारंभ
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष तमाण्णा गावडे गुरुजी राहणार आहेत. तर दीपप्रज्वलन महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, जि. पं. माजी सदस्य जोतिबा रेमाणी, सामाजिक कार्यकर्ते चंबाण्णा होळसंग तसेच हॉटेल ओमकारचे मालक राजेश फासळकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. तर मऱयाम्मा देवीचे पूजन उद्योजक जी. पी. शेट्टी यांच्या हस्ते तर पावती पुस्तकाचे पूजन कुमार थंगम यांच्या हस्ते होणार आहे. तर मुख्य भूमिपूजन उद्योजक परशराम कलाल यांच्या हस्ते तर पायाखोदाई भू विकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, शेखर शेट्टी, ग्रा. पं. माजी अध्यक्ष रामचंद्र चौगुले, उद्योजक चंद्रशेखर दामले, ऍड. ईश्वर घाडी, नगरसेवक नारायण मयेकर, बाबू निरलगी, सुरेश दंडगल, प्रविण अगणोजी, मल्लाप्पा मेणशिनकायी, अरुण कोडला आदींच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमालाही सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.