सुदिन ढवळीकर यांची माहिती, उगवे-तांबोसे-मोप पंचायतीच्या पाच सदस्यांचा मगो पक्षात प्रवेश
प्रतिनिधी /पेडणे
मगो पक्षाची धुरा येणाऱया काळात युवा पिढीच्या हाती देण्यात येणार असून युवा नेतृत्वाला मगो पक्षाचे कार्य पुढे नेण्यासाठी संधी देणार आहे. याचबरोबर मगो पक्षाचे 12 उमेदवार निश्चित झाले असून यामध्ये 50 वर्षाखालील उमेदवारांना उमेदवारी देण्यात येणार आहे. मात्र यामध्ये युतीसाठी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, अशी माहिती मगो नेते तथा मडकई मतदारसंघाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिली.
उगवे-तांबोसे-मोप पंचायतीच्या पाच सदस्यांनी मंगळवारी सरपंच व उपसरपंचसह मगो पक्षात प्रवेश केला. त्यांना मगो पक्षात प्रवेश दिल्यानंतर सुदिन ढावळीकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पेडणे मतदारसंघाचे मगो नेते प्रवीण आर्लेकर, मांदे मतदारसंघाचे मगो नेते जीत आरोलकर, मगो पक्षाचे कार्यकारिणी सदस्य सुदिप कोरगावकर, प्रवक्ते उमेश तळवणेकर, वजरीच्या माजी सरपंच संगीता गावकर, नरेश कोरगावकर, देवानंद गावडे, कमळेश्वर पंचायत देवस्थानचे मधुसुदन थळी, धारगळचे माजी पंच आवेलीनो फर्नांडिस, निकिता मांदेकर आदी उपस्थित होते.
भाजप सरकारने प्रत्येक गोमंतकीयावर पाच लाख कर्ज काढले
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रशासनावर लक्ष नाही. सामान्य जनतेला महागाईच्या खायीत सरकारने लोटले असून प्रकल्पाच्या नावाने आज सर्वत्र लूट चालली आहे. याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री आहेत. आज सरकारने प्रत्येक गोमंतकीय नागरिकावर पाच लाख कर्ज काढले आहे. हे कर्ज फेडावेच लागणार असून भाजप सरकारला जनता कंटाळली आहे असे सुदिन ढावळीकर म्हणाले.
भूमिपुत्र विधेयकाला ठाम विरोध
भूमिपुत्र विधेयकाला आमचा ठाम विरोध आहे. या विधेयकात पिढीजात शेकडो वर्षापूर्वीच्या जमिनी राखून ठेवलेल्याना सरकार जमीन हक्कावरुन बेदखल करु पाहत आहे. या विधेयकात अनेक त्रुटी आहेत. भाऊसाहेब बांदोडकर यांनी कुळ मुंडकार कायदा आणला. कसेल त्यांची जमीन आणि राहिल त्याचे घर हा कायदा आणून भूमिपुत्रांना संरक्षण दिले. मात्र भाजप सरकार हे सर्व नेस्तनाबूत करुन मुळ भूमिपुत्रांना भूमीहिन करू पाहत आहे. आम्ही कुणाच्या विरोधात नाही, मात्र ज्या काही गोष्टी कायद्याच्या चौकटीत आहेत त्याच सरकारने कराव्यात असे ढवळीकर म्हणाले.
गद्दारी करुन पक्ष सोडला ते राजकारणातून संपले
ज्यानी मगो पक्षाशी गद्दारी करून पक्ष सोडला त्यांची आज काय परिस्थिती आहे हे तुम्ही पहात आहात. त्यांना काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी आता हात पसरावे लागत आहेत, असेही यांनी सांगितले.
मगो पक्षात अनेकजण प्रवेश करणार : प्रवीण आर्लेकर
पेडणे मतदारसंघाचे मगो नेते प्रवीण आर्लेकर यांनी पक्षात प्रवेश केलेल्या पाचही पंच सदस्यांचे स्वागत करत त्यांना धन्यवाद दिले. येणाऱया अनेक पंचायतीचे पंचसदस्य मगो पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगून आपण आता जोमाने काम करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पाच पंचसदस्यांनी मगो पक्षात प्रवेश करुन मगो पक्षा व प्रवीण आर्लेकर यांचे हात बळकट केल्याचे जीत आरोलकर यांनी सांगितले. मगो प्रवक्ते उमेश तळवणेकर, उपसरपंच सुबोध महाले, आवेलिनो फर्नांडिस, सरपंच सरस्वती नाईक, पंच मधुसुदन सामंत यांचीही भाषणे झाली.
उगवे-तांबोसे-मोप या पंचायतीच्या सात सदस्यांपैंकी सरपंच सरस्वती नाईक, उपसरपंच सुबोध महाले, पंचसदस्य प्रसाद महाले, पंच दीपक तांबोस्कर व पंच मधुसुदन सामंत यांच्यासह थॉमस फर्नांडिस, संतोष कोनाडकर, मिलिंद सामंत, विजया तांबोस्कर, सारिका तांबोस्कर, रवींद्र तांबोस्कर, रवींद्र आसोलकर, प्रसाद गवंडी, दिया तांबोस्कर, वैष्णवी तांबोस्कर आदी कार्यकर्त्यांनीही मगो पक्षात प्रवेश केला. सूत्रसंचालन सिंथिया गावकर यांनी केले तर सुदिप कोरगावकर यांनी आभार मानले.