प्रसाद नागवेकर/ मडगाव
मे महिन्यास प्रारंभ झाल्यापासून मडगावातील आंब्याची घाऊक बाजारपेठ भर पहाटे आंब्याच्या पिवळय़ा रंगाने झगमगून जात असल्याचे दिसून येत आहे. मानकुराद, हापूस, मोसुराद, केसर व अन्य आंबे मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असल्याने आता दर खाली उतरले असून ते सामान्यांना खिशाला परवडू लागले आहेत. गोमंतकीयांच्या सर्वाधिक पसंतीचा आंबा म्हणजे एकदम चवीला गोड असलेला मानकुराद आंबा खवय्यांच्या पसंतीमध्ये पहिल्या मानाचा ठरला आहे.
सध्या बाजारपेठत याच मानकुराद आंब्याला जास्त पसंती असल्याचे दिसून येते. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत तीन ते अडीच हजार रुपये डझन अशा चढय़ा दराने मिळणारे मध्यम व मोठय़ा आकाराचे आंबे आता 550 ते 700 रु. डझन अशा दराने किरकोळ बाजारात उपलब्ध आहेत. मध्यम आकाराचे 300 ते 400 रु. डझन, तर एकदम लहान आकाराचे मानकुराद आंबे 150 ते 250 रुपयांत उपलब्ध असल्याने सामान्यजनही मानकुरादचा आस्वाद आता लुटू शकतात, अशी माहिती मडगावातील घाऊक आंबेविपेता राजेश नाईक यांनी दिली. मानकुराद मोठय़ा संख्येने शिवोली तसेच मडकई, फोंडा, कुंकळ्ळी, धर्मापूर, कुंडई व शिरोडा या राज्यातील गावांतून मडगावच्या घाऊक बाजारपेठत दाखल होत असल्याचे नाईक यांनी सांगितले.
हापूसची आवकही वाढली
मडगावात आता हापूस आंब्यांचीही आवक वाढली आहे. घाऊक बाजारपेठेत 100 हापूस आंबे दीड ते दोन हजारांना विकले जात आहेत. किरकोळ बाजारात आकारानुसार 200 ते 350 रु. डझन दराने हे आंबे उपलब्ध आहेत. याखेरीज मोसुराद हा गोव्यातील अन्य एक लोकांच्या पसंतीत उतरणारा आंबा असून त्याचे दर प्रति शेकडा 4 ते 5 हजार रु., तर प्रति डझन 600 रुपयांच्या आसपास आहे. पायरी प्रकारच्या आंब्याची प्रति शेकडा 1500 रु., तर 150 ते 200 रु. प्रति डझन अशा दराने विक्री केली जात आहे. याशिवाय अन्य विविध जातींचे लहान आकाराचे आंबे मडगावच्या बाजारपेठेत 100 ते 150 रु. प्रति डझन असे विकले जात आहेत.
आणखी पंधरवडाभर येईल पीक
हापूस आंबाचे पीक गोव्यातही लक्षणीय स्वरूपाचे असून कोकण-महाराष्टातून त्याची आयात होत असते, अशी माहिती नाईक यांनी दिली. मानकुराद, मोसुराद, हापूससारख्या आंब्यांचे पीक आणखी पंधरवडाभर मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होईल. त्यामुळे आंबेप्रेमींना मोठय़ा आकाराच्या आंब्यांचे दर आणखीन उतरून त्यांचा आस्वाद घेता येईल, अशी माहिती मडगावातील एका किरकोळ विपेत्याने दिली. पावसाळा जवळ आल्यावर वरील प्रकारच्या आंब्यांचा मोसम संपणार असला, तरी गोमंतकीयांची आंबा खाण्याची गोडी कमी होणार नसून त्यानंतर कुलासो, आफान्सो यासह नीलम, तोतापुरीचे आगमन खवय्यांना तृप्त करणारे असेल. त्यामुळे मडगावच्या पिंपळकट्टय़ानजीकच्या परिसरात आणखी काही महिने आंब्यांचा हा सुगंध दरवळत राहील हे मात्र नक्की.