कोरोनामुळे गेला बळी
प्रतिनिधी/ मडगाव
मडगावातील होली स्पिरीट चर्चजवळ राहणारे सेवाभावी डॉ. मारियो गुदिन्हो यांचा शुक्रवारी रात्री मडगावातील एका खासगी हॉस्पिटलात कोरोनामुळे बळी गेला. शनिवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनामुळे बळी जाणारे ते गोव्यातील तिसरे डॉक्टर ठरले. यापूर्वी डॉ. सुरेश आमोणकर तसेच डॉ. पुरूषोत्तम कारेकर यांचा बळी गेला होता.
16 सप्टेंबर रोजी डॉ. मारियो गुदिन्हो यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना गोमेकॉत नेण्यात आले होते. परंतु, गोमेकॉत खाटा उपलब्ध नसल्याने, त्यांना मडगावातील एका खासगी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. मारियो गुदिन्हो हे सेवाभावी डॉक्टर म्हणून सर्वांच्याच परिचयाचे होते. एखादी व्यक्ती आजारी पडली व डॉक्टरांकडे रात्री-अपरात्री संपर्क साधला तरी डॉक्टर त्या व्यक्तीसाठी उपलब्ध व्हायची. वेळेप्रसंगी स्वत:चे वाहन घेऊन रुग्णांपर्यंत जायची. गरीब-श्रीमंत असा भेदभाव त्यांनी कधीच केला नव्हता. अनेक रुग्णांना त्यांनी आजारातून बरे गेले होते. शेवटी रुग्णांची सेवा करतानाच, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला व त्यात त्यांनी आपले प्राण गमावले.
अनेक मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मारियो गुदिन्हो यांच्या निधनाची माहिती मिळताच अनेकांना धक्काच बसला. डॉ. शेखर साळकर यांनी डॉ. गुदिन्हो यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. रुग्णांची सेवा करताना वैद्यकीय क्षेत्रातील तीन डॉक्टर सुरेश आमोणकर, डॉ. पुरूषोत्तम कारेकर व डॉ. मारियो गुदिन्हो यांनी आपले प्राण गमावले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.