प्रतिनिधी /मडगाव
पालिका चौकात मडगाव नगरपालिका दोन दिवसीय कार्निव्हल कार्यक्रमांचे आयोजन करणार असून त्याच्या अंतर्गत शुक्रवार 25 रोजी ऍड. जॉन फर्नांडिस आणि त्यांचे पथक गोव्यातील पारंपरिक लोकनृत्ये आणि पारंपरिक संगीताचा कार्यक्रम सादर करणार असल्याची माहिती मडगाव कार्निव्हल समितीचे अध्यक्ष तथा मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी दिली.
शनिवार 26 रोजी दुमिंग मास्कारेन्हस आणि सां जुझे दि आरियलमधील त्यांचे पथक जागोर हा पारंपरिक कार्यक्रम सादर करतील. दुमिंग हे गोव्यातील ज्ये÷ लोककलाकारांपैकी एक असून ते ख्रिस्ती समुदायाने सादर केलेल्या अनेक शतके जुन्या जागोरच्या जतनासाठी झटत आहेत. आचारसंहितेसह विविध निर्बंधांमुळे सर्व कार्यक्रम संध्याकाळी 5 वा. सुरू होतील आणि रात्री 10 वा. संपतील, असे फर्नांडिस यांनी सांगितले.
वरील कार्यक्रमांव्यतिरिक्त, पारंपरिक मडगाव कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक रविवार 27 रोजी सायंकाळी 3.30 वा. आयोजित केली जाईल. दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयाच्या इमारतीपासून पुढे रवींद्र भवनमार्गे बोरकर सुपर स्टोअर्स, फातोर्डा येथे येऊन मिरवणूक समाप्त होईल. तसेच विविध लोककलाकार पालिकेच्या प्रत्येक वॉर्डात खेळ तियात्रांचे सादरीकरण करणार आहेत. प्रख्यात ड्रमर बोंडो यांचे लाईव्ह बँड तसेच डीजे कार्यक्रम यंदा सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती फर्नांडिस यांनी दिली.