तुळशी वृदांवन व नळाची मोडतोड
प्रतिनिधी /मडगाव
मारीया बांद-मडगाव येथे एक बेकायदेशीर बांधकाम केले जात असून हे बांधकाम बंद ठेवण्याचा आदेश मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी 18 जून रोजी दिला आहे. मात्र, या आदेशाला काडीची देखील किंमत न देता संबंधितांनी हे बेकायदेशीर बांधकाम पूर्ण करण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे. मडगाव पालिका क्षेत्रात अशी असंख्य बेकायदेशीर बांधकामे होत असून नगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
या बेकायदेशीर बांधकामासंदर्भात मारीया बांद येथील रामनाथ कृष्णा नाईक यांनी श्रीमती वासंती उमानाथ बोरकर, सोनिया उमानाथ बोरकर व योगेंद्र कालिदास नाईक हे बेकायदेशीर बांधकाम करीत असून आपल्या तुळशी वृदांवन तसेच पाण्याच्या नळाची मोडतोड केल्याची तक्रार मडगाव नगरपालिकेकडे केली होती. या तक्रारीची देखल घेताना मुख्याधिकारी श्री. फर्नांडिस यांनी बांधकाम बंद ठेवण्याचा आदेश जारी केला होता.
या बांधकामांसाठी संबंधितांनी गोवा नगरपालिका कायदा 1968 अंतर्गत कोणतीच परवानगी घेतली नव्हती असे मुख्याधिकाऱयांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर 15 दिवसात या बेकायदा बांधकामांवर का कारवाई करू नये याचे स्पष्टीकरण मागितले आहे.
तुळशी वृदांवन व नळाची मोडतोड
हे बेकायेदशीर बांधकाम करताना संबंधितांनी रामनाथ नाईक यांच्या तुळशी वृदांवन व नळाची मोडतोड केली आहे. या संदर्भात त्यांनी मडगाव पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली असून पोलिसांनी हे प्रकरण अदखलपात्र गुन्हा अशी नोंद केली आहे.