तासगाव पोलिसांचा अंदाज, मोबाईलच्या सिडीआर रिपोर्टमध्ये तिघांचे वर्षभरात एकमेकांना ७००ते ८०० कॉल !
मणेराजूरी / वार्ताहर
मणेराजुरी ता.तासगांव येथील शेकोबा डोंगरावर गुरुवारी तिघांनी केलेली आत्महत्या प्रेमत्रिकोणातून झाली असावी असा अंदाज तासगाव पोलिसांनी व्यक्त केला. अजूनही तासगाव पोलीसांचा तपास सुरूच आहे ;तर सिडीआर रिपोर्टमधे हरीश, प्रणाली व शिवानी यांनी वर्षभरात ७००ते८०० कॉल केले आहेत. तर चिट्ठीवर पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे. गुरुवारी तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील शेकोबा डोंगरावर हरिश जमदाडे, रा . मणेराजूरी ;प्रणाली पाटील ( मूळ गाव जायगव्हाण सध्या रा. मणेराजुरी, ता. तासगाव) व शिवानी घाडगे (रा. हातीद, ता. सांगोला) या तिघांनी विष पिऊन आत्महत्या केली होती.
पोलीसांनी पुढे सांगितले की ; आत्महत्या केलेल्या हरिश जमदाडे, प्रणाली पाटील यांचे प्रेमसंबंध होते. तर शिवानी घाडगे हिचेही मणेराजुरी येथे नातेवाईक असल्याने ती सातत्याने यायची. या नातलगामधील एका तरुणाची हरीश सोबत मैत्री होती व यातूनच हरीश व शिवानी हिचा संपर्क झाला होता.
मात्र हातीदच्या तरुणीच्या कुटुंबीयांनी व्यक्त इलेल्या चिठ्ठीवर पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे. नातेवाईक असल्याने संबंधित एकाचे नाव यात गोवण्यात येत असून सदर नातेवाईकाचे व शिवानी यांच्यात वर्षभरात ४ ते ५ वेळा कॉल झाला होता. त्यांनी वापरलेली सिम चार महिन्यांपूर्वीच बंद असल्याचे समोर आले आहे. मात्र नवीन मोबाईल मधून कोणते सिम वापरून संपर्क करण्यात येत होता त्याचा शोध ई एम आय नंबरच्या माध्यमातून घेतला जाईल असे पोलिसांनी सांगितले. एकूणच या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा झाला नसल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे.