मनपाने घेतल्या 676 थर्मल मशीन : मतदान केंद्रांची स्वच्छता, सॅनिटायझर फवारणी
प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील दक्षिण आणि उत्तर मतदार संघात 676 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच 6300 कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक मतदाराची थर्मल चाचणी करण्याकरिता 676 स्क्रिनिंग मशीन घेण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्राची स्वच्छता करून सॅनिटायझर फवारणी करण्यात येत आहे.
पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याने प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. तसेच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोरानाच्या नियमावलीचे पालन करीत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेवर आहे. एक हजारहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रातील मतदारांची विभागणी करून मतदान बुथची संख्या वाढविण्यात आली आहे. दक्षिण मतदार संघात 2 लाख 43 हजार 27 मतदार असल्याने 336 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. तर उत्तर मतदारसंघात 2 लाख 42 हजार 618 मतदार असून 340 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व मतदान केंदांवर व्यवस्थित मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पीआरओ, एपीआरओ आणि पीएस अशा पदावर दोन्ही मतदारसंघांत 6300 कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन्ही मतदारसंघांत एकूण 676 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची थर्मल चाचणी करण्यात येणार आहे. त्याठिकाणी चाचणी करण्यासाठी आणि मतदारांना सेनिटायझर देण्यासाठी कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर थर्मल स्क्रिनिंग चाचणीत पास झाल्यानंतर मतदारांना मतदान करण्यासाठी केंद्रावर जाता येणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्राची स्वच्छता करून सेनिटायझर करण्याचे काम महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सर्व केंद्रांचे सेनिटाझर करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.