बेळगाव / प्रतिनिधी
स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या स्मार्ट बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले असून आवारात सुरू असलेल्या भुयारी मार्गाचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. मध्यवर्ती-सीबीटी बसस्थानक जोडण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात येत आहे. शिवाय क्लोजडाऊनचा नियम जारी असला तरी काम सुरू असल्याने सर्वसामान्य प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
बसस्थानकातील गर्दी व वाहतुकीची कोंडी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येत असलेल्या भुयारी मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. नेहमी हजारो प्रवाशांनी गजबजलेल्या बसस्थानकाच्या आवारात मध्यवर्ती-सीबीटी बसस्थानक जोडण्यासाठी भुयारी मार्गाचा विकास करण्यात येत आहे. त्यामुळे आवारातील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. दोन वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात झाली होती. गतवषी कोरोनाकाळात कामगारांअभावी काम रेंगाळले होते. त्यानंतर संथगतीने काम सुरू झाल्याने दोन वर्षे उलटली तरी काम सुरूच आहे. मात्र, आता या कामाला जोर आला असून स्लॅब भरणीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
या मार्गामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असून हा भुयारी मार्ग प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. पादचारी प्रवाशांची धावपळ कमी होणार आहे. लहान वाहने व पादचारी प्रवाशांना दोन्ही बसस्थानकांकडे ये-जा करणे सोयीस्कर व्हावे, या दृष्टिकोनातून उभारण्यात येत असलेल्या भुयारी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करून हा मार्ग प्रवाशांना खुला करावा, अशी मागणी होत आहे.