प्रतिनिधी / सांगली
महापालिकेच्या दहा आरोग्य केंद्रासह प्रसूतीगृह आणि पंचमुखी मारुती रस्त्यावरील डायग्नेस्टिक सेंटर मध्ये सर्व प्रकारच्या चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. सांगली महापालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महालॅब यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत या चाचण्या होणार असून महापालिका क्षेत्रातील रुग्णांनी चाचणी करण्यासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे, असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात अनेक खासगी लॅब आहेत. रुग्णांची प्रचंड आर्थिक पिळवणूक या लॅबमध्ये होते. गोरगरीब रुग्णांना चाचण्या करण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागते. दरम्यान महापालिकेने सुरु केलेल्या मोफत चाचण्यांच्या उपक्रमामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महापालिका आणि महालॅबच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रात मनपाची १० प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. दोन प्रसूतीगृह तसेच एक डायग्नेस्टिक सेंटरही आहे. अशा १३ केंद्रांवर मोफत चाचण्यांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सर्व प्रकारचे ताप, डेंगू आजाराचे निदान, कॅन्सर उपचार सुरु असताना आवश्यक तपासण्या, सर्व प्रकारच्या आजारांच्या निदानासाठी आवश्यक असणाऱ्या तपासण्या, किडनी आजार निदानासाठी उपयुक्त तपासण्या सर्व प्रकारच्या, प्रथिने, हृदय रोग, बीपी, मधुमेह रुग्णासाठी उपुयक्त तपासण्या, स्वादुपिंडाच्या कार्याचे निदान, पोटविकार, हाडातील कल्शियम, अतिसार अशक्तपणा, सांधेदुखी, रक्तातील साखर, थॉयराईड निदानासह जवळपास २८ विविध तपासण्या या उपक्रमांतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोफत करण्यात येणार आहेत.