ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित ठाकरे यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यानंतर चाचणी केली असता, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरेंची प्रकृती सध्या स्थिर आहे. तरी त्यांना खबरदारी म्हणून मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अमित ठाकरेंना यापूर्वीही ऑक्टोबर 2020 मध्ये थोडा ताप आल्यामुळे लीलावती रुग्णालया दाखल करण्यात आले होते. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे अमित ठाकरेंना रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपचार केला जात आहे. अमित ठाकरे यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.