रशिया येथे जागतिक कुस्ती स्पर्धेत कास्यपदकाला गवसणी
फिरोज मुलाणी / औंध :
रशिया (उफा) येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत आज पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर) याने 92 किलो वजनगटात कास्यपदक मिळवून कुस्तीपंढरीचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला.
92 किलो वजनगटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात कास्यपदकासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत कुस्तीपंढरीतील पृथ्वीराज पाटील यांने रशियाचा तगडा मल्ल किरील्लोव याला दोन विरुद्ध एक गुणांनी धूळ चारत पदकाला गवसणी घातली. पृथ्वीराजचे मुळ गाव कुस्तीपंढरीतील देवठाणे ता. पन्हाळा आहे. तो शाहू कुस्ती केंद्र (शिंगणापूर, कोल्हापूर) येथे प्रशिक्षक जालिंदर मुंडे व आंतरराष्ट्रीय मल्ल शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. महाराष्ट्र केसरी, वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धा, कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत त्याने पदक मिळवून कुस्तीक्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. प्रतिकूल परिस्थितीतून कुस्तीपंढरीचा झेंडा सातासमुद्रापार फडकावून यशाच्या शिखराकडे वाटचाल करणाऱ्या पृथ्वीराजला अद्याप एकही प्रायोजक मिळालेला नाही. मोठ्या हिमतीने पृथ्वीराजची वाटचाल सुरु आहे.
पुढील वाटचालीत मदतीचा हात मिळाल्यास त्याचा कुस्तीतला प्रवास सुखकर होईल, अशी चर्चा कुस्तीक्षेत्रात सुरू आहे. त्याने मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, कोल्हापूर जिल्हा तालिम संघ आणि कुस्ती शौकिनांनी अभिनंदन केले आहे.