ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला विश्वास
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाविकासआघाडीवर त्यांनी रोष व्यक्त केला आहे. त्यांचा आक्रमकपणा स्वाभाविक आहे. पण नेतृत्वाखालीलच मराठा आरक्षणाची लढाई यशस्वी होईल असा मला विश्वास आहे. असे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खासदार संभाजीराजे यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर आघाडी सरकार सकारात्मक आहे. त्यांनी केलेल्या सर्व मागण्याची पूर्तता करण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर राज्यभरातून तीव्र पडसाद उमटले. ठिकठिकाणी संताप व्यक्त होत आहे. विशेषता विरोधी पक्षाने या विषयावरुन आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर सुरुवातीपासून मराठा आरक्षणाच्या लढ्यात अग्रभागी असलेले खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी नाशिक येथे संतप्त भावना व्यक्त केल्या.
मराठा समाजाच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा 27 मे पासून राज्यभर आंदोलनाचा भडका उडले असा सनसनीत इशारा संभाजी संभाजीराजे यांनी दिला आहे. याकडे मंत्री हसन मुश्रीफ यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, खासदार संभाजीराजे हे छत्रपती आहेत. त्यांचा पहिल्यांदाच असा रुद्रावतार आम्हाला पाहायला मिळाला. त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोतच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळा पत्र पाठवून मराठा आरक्षणावर बैठक घेण्याची विनंती केली होती. परंतु मोदी यांनी याकडे लक्ष दिले नाही. संभाजीराजे यांनी मोदी यांच्यासह आघाडी सरकारवरही संताप व्यक्त केलेला आहे. त्यांनी व्यक्त केलेली ही नाराजी योग्यच आहे. नाराजी आम्ही समजू शकतो, त्यांना यानिमित्ताने आघाडी सरकारचा एक घटक म्हणून मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो की आघाडी सरकार त्यांच्या भूमिके सोबत आहे. सोबत आहे ते मराठा समाजाचे नेतृत्व करत आहेत मराठा आरक्षणाचा लढा त्यांच्याच नेतृत्वाखाली यशस्वी होईल. या लढ्यात आघाडी सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक राजू लाटकर, गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ, आदील फरास, महेंद्र चव्हाण उपस्थित होते.