- एक राजा बिनडोक; तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच अधिक भर
ऑनलाईन टीम / पुणे :
मराठा आरक्षणासाठी 10 तारखेला पुकारलेल्या बंदला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देणार असल्याची घोषणा, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सध्या मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेतृत्वाबद्दल खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांना समाजाकडून आवाहन केले जात आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरुन या दोन्ही राजेंवर जहरी टीका केली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, दोन्ही राजांचा आंदोलनाला पाठिंबा आहे, असे मला वाटत नाही. यातील एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ज्या व्यक्तिला घटना माहीत नाही, जो व्यक्ती असे म्हणतो की आम्हाला आरक्षण मिळाले नाही, तर कोणालाच मिळू नये याला भाजपने राज्यसभेवर कसे पाठवले याचे आश्चर्य आहे. मी कोणालाही अंगावर घ्यायला घाबरत नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पुढे ते म्हणाले, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये.
आरक्षणाच्या विषयाला फाटे फोडण्याच काम सुरू आहे. यातून महाराष्ट्राचे सामंजस्य बिघडत असल्याचे चित्र आहे. ते बिघडू नये असे त्यांनी यावेळी सांगितले.