सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने उपक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून मराठी विद्यानिकेतन येथे सोमवारी महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने व्यवसाय शिक्षण केंद्राचे उद्घाटन कोल्हापूरच्या राज्यकर उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या तेजस्विनी मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील होते.
प्रास्ताविक व स्वागत सुभाष ओऊळकर यांनी केले. प्रमुख पाहुण्या तेजस्विनी मोरे यांची ओळख उपक्रमाच्या समन्वयक श्रुती केवाडकर यांनी करून दिली. सावित्रीबाई फुले यांचे गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
मराठी विद्यानिकेतनतर्फे महिला सक्षमीकरण व व्यवसाय शिक्षण याअंतर्गत संगणक, हस्तकला, चित्रकला व भरतनाटय़म् नृत्यकलेचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहेत. मुख्यतः कॉलेजच्या तरुणी, गृहिणी, ऑफीस किंवा मार्केटिंगसाठी काम करणाऱया महिलांना संगणक शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर हस्तकलेच्या माध्यमातून गृहिणींना व विद्यार्थिनींना पेपर पॅकेट, पेपर बॅग, पेम, ग्रिटींग, पेपर फुले, पुष्पगुच्छ, वॉलपीस, लोकरी वस्तू अशा कलाकुसरीच्या वस्तू शिकविल्या जातील. दररोज सायंकाळी 4.30 ते 5.30 यावेळेत हे कोर्स सुरू राहतील. यासाठी लता नगरे, लता पाटील, श्रुती कोवाडकर, मानसी पाटील या मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रा. विक्रम पाटील यांचेही भाषण झाले. यावेळी मराठी विद्यानिकेतनचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, मुख्याध्यापक इंद्रजित मोरे, शिक्षकवर्ग उपस्थित होता.