समाजकंटकांच्या कृत्यामुळे धामणे येथील शाळेचे दोन लाखाचे नुकसान
वार्ताहर / धामणे
धामणे येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या 5 खोल्यांचे दरवाजे मोडून प्रत्येक खोलीतील फर्निचर व कपाटाचे कुलूप तोडून शाळेतील कागदपत्रे फाडून विस्कटून टाकली असून शाळेचे दोन लाखाचे नुकसान झाल्याचा प्रकार मंगळवारी शाळेच्या मुख्याध्यापिका जी. एस. गाडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी लागलीच शाळेचे एसडीएमसीचे माजी अध्यक्ष व सद्याचे सदस्य भाऊ पाटील यांच्याशी संपर्क साधल्याने ते शाळेत तातडीने दाखल झाले. त्यांनी ग्राम पंचायतला झालेला प्रकार कळविला. धामणे हट्टी रोडशेजारी मराठी शाळेच्या पाच खोल्या असून या शाळेच्या पटांगणात क्रिकेट खेळाडूंची दररोज गर्दी असते. त्याचप्रमाणे या शाळेच्या परिसरात रात्री अंधार असल्याने येथे अनके प्रकारचे गैरप्रकार घडत असतात. अशा प्रकारची शाळेची मोडतोड अनेक वेळा झालेली आहे. परंतु एवढय़ा मोठय़ा प्रमाणात झाली नव्हती. परंतु काल रात्री घडलेल्या प्रकाराने शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारच्या शाळेतील मोडतोडीच्या घटना फक्त मराठी शाळेतीलच का होतात? धामणे गावात कन्नड, उर्दु शाळा आहेत. मात्र वारंवार मराठी शाळेचे नुकसान केले जात असल्याने धामणे गावातील मराठी नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता या प्रकाराबद्दल धामणे ग्राम पंचायत काय निर्णय घेणार, याकडे मराठी भाषिक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.