अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये
अभिनेत्री मलायका अरोरा सध्या स्वतःचा ओटीटी शो ‘मूव्हिंग इन विथ मलायका’वरून चर्चेत आहे. या शोच्या नव्या एपिसोडमध्ये मलायकाने स्वतःच्या दुसऱया विवाहाबद्दल खुलासा केला आहे. आपण लवकरच विवाह करणार आहोत असे मलायकाने स्वतःची बहिण अमृताशी बोलताना सांगितले आहे.
अमृतासोबत झालेल्या संभाषणानुसार मलायका लवकरच दुसरा विवाह करण्याची तयारी करत असल्याचे समजते. परंतु यासंबंधी अद्याप काहीच अधिकृत घोषणा झालेली नाही. मलायकाने या शोमध्ये स्वतःच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. मलायकाच्या चाहत्यांची संख्या मोठी असल्याने या शोला मोठा प्रतिसाद देखील मिळत आहे.
मलायकाने 1998 मध्ये अभिनेता अरबाज खानसोबत विवाह केला होता. या दोघांना अरहान नावाचा मुलगा देखील आहे. विवाहाच्या 19 वर्षांनी मलायका अन् अरबाज यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. घटस्फोटानंतर देखील मलायका अन् अरबाज अनेकदा स्वतःच्या मुलासोबत दिसून येतात. मलायकाने घटस्फोटावेळी अरबाजकडून 15 कोटी रुपयांची पोटगी घेतली होती.
अरबाजसोबतच्या नात्यातून बाहेर पडल्यावर मलायका आता अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. अर्जुन कपूरसोबत मलायका लवकरच विवाहबद्ध होण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. तर अरबाज खान हा मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.