ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात पोलिसांच्या बदल्यांचा महाघोटाळा झाला. या महाघोटाळय़ाची सर्व माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना दिली. त्यानंतर उच्च न्यायालयाने या घोटाळय़ाची चौकशी सीबीआयकडे सोपवली. सहा महिने या घोटाळय़ाची सरकारने चौकशी का केली नाही? मी हा घोटाळा बाहेर काढला नसता तर कोटय़वधी रुपयांचा घोटाळा दबून गेला असता. आज या प्रकरणी झालेल्या चौकशीत मला आरोपी, सहआरोपी बनवलं जाईल, असे प्रश्न करण्यात आले. दरम्यान, माझ्यावर ऑफिशियल सिक्रसी ॲक्ट लागू होत नाही. मला कितीही गोवण्याचा प्रयत्न केला तरी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणारच, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
30 मे 2021 ला महाराष्ट्रात झालेल्या बदली घोटाळय़ाची कागदपत्रे केंद्रीय गृह सचिवांना फडणवीस यांनी दिली होती. कोटय़वधीचा बदली घोटाळा झाला. ही कागदपत्रे बाहेर कशी गेली त्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. त्याचप्रकरणी आज फडणवीस यांची चौकशी झाली.
दोन तासांच्या चौकशीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मला पोलिसांनी जी प्रश्नावली पाठवली होती आणि चौकशीत जे प्रश्न विचारण्यात आले, यात काहीसा फरक होता. मी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. सरकारने लपवलेला रिपोर्ट मी बाहेर काढला. त्यात आयपीएस अधिकाऱ्यांपासून सगळय़ांची नावं होती. त्यामुळे मी ही कागदपत्रे केंद्रीय गृह सचिवांना दिली होती. ऑफिशियल सिपेसी घोटाळय़ाचं उल्लंघन केल्याचे सांगत मला आरोपी किंवा सहआरोपी बनवलं जाईल असे प्रश्न केले. माझ्यावर ऑफिशियल सिक्रसी ॲक्ट लागू होत नाही. माझ्यावर लागू झाला तर व्हिसल ब्लोअर ॲक्ट लागू झाला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.