प्रतिनिधी/ सातारा
येथील योजनानगर येथील एका मसाला विक्रेत्याची 3 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्नील नारायण कुलकर्णी असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून त्याला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, फसवणुकीचा हा प्रकार दि. 21 एप्रिल 2021 रोजी घडला असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, हेमंतकुमार प्रल्हाद जिरेसाळ (वय 61, रा. प्लॉट नंबर 13, वक्रतुंड, योजनानगर को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, केबीपी कॉलेजजवळ, सदरबझार, सातारा) हे मसालाविक्रेते असून त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, स्वपनील नारायण कुलकर्णी (रा. महागांव, ता. सातारा) याने हेमंतकुमार आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी आपण नऊ गीर गायी विकत घेवू आणि आपण त्यांचे पालनपोषण करुन त्याचे दूध विक्री करुन मी तुम्हाला दरमहा 27 हजार रुपये देतो, असे म्हणून 3.45 लाख रुपये घेतले.
मात्र, स्वप्नील याने कराराप्रमाणे व्यवहार न करता हेमंतकुमार यांची फसवणूक केली. दरम्यान, आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली. याप्रकरणी स्वप्नील याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप मोरे करत आहेत.