प्रतिनिधी/ रत्नागिरी
देशव्यापी संपात नॅशनल फेडरेशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज युनियन एनएफपीई या शिखर संघटनेनेही सहभाग घेतला आहे. रत्नागिरीतील मुख्य डाक विभाग कार्यालयासमोर या कर्मचारी संघटनेने केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने केली. तर विविध मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱयांनीही सोमवारी रत्नागिरीत लाक्षणिक संप केला.
राज्यातील महसूल विभागात महसूल सहाय्यक पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत. त्यासाठी तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यात यावी. आकृतीबंधात सुधारणाबाबत दांगट समिती अहवालानुसार पदे मंजूर करावीत. यासह 15 हून अधिक मागण्यांचे पत्र महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने सोमवारी मुख्यमंत्र्यांसह, महसूलमंत्री व मुख्य सचिवांना दिले. मंत्रालयासह प्रत्येक जिल्हा व विभागात कर्मचाऱयांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. यानंतरही राज्य शासनाने विचार केला नाही तर 4 एप्रिलपासून बेमुदत संपाचा निर्णय जाहीर केला आहे. रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील महापुरुष मंदिरात लाक्षणिक संप करण्यात आला. यामध्ये संघटनेचे सुनील कीर, अभिजीत शेटय़े यांच्यासह मुख्यालयातील कर्मचारी सहभागी होते.
जिल्हा टपाल विभागातील कर्मचारी संघटनचीही निदर्शने
केवळ वेतन दिले म्हणजे सारे काही झाले अशी सरकारची भूमिका आहे. पण सरकारच्या कामगार विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी ही संघटना संपात सहभागी झाली आहे. प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. त्यामध्ये टपाल खात्यातील 70 टक्के पेक्षा जास्त कर्मचारी सहभागी असल्याचे सांगण्यात आले.