अभ्यासासाठी जेलिफिशचे नमुने ‘सीएमएफआरआय’कडे सुपुर्द
मालवण:
दांडी समुद्र किनारी गेल्या दोन महिन्यात सातत्याने सापडलेल्या ‘त्या’ महाकाय जेलिफिशचे जतन केलेले काही नमुने तपासणीसाठी मुंबई वर्सोवा येथील केंद्रीय मत्स्यकी संशोधन संस्थे (सीएमएफआरआय) च्या टीमकडे सुपुर्द करण्यात आले. लवकरच या नमुन्यांच्या आधारे या महाकाय जेलिफिशसंदर्भातील नेमकी माहिती समोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
दांडी समुद्र किनारी जानेवारी आणि फेबुवारीमध्ये रापणींना सातत्याने ‘सायनिया रोझी’ प्रजातीतील महाकाय जेलिफिश सापडले. त्यावेळी सीएमएफआरआयच्या शास्त्रज्ञांना महाकाय जेलिफिशची माहिती दिली असता, ते ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडलगतच्या पॅसिफिक महासागरात पाहायला मिळतात. भारतात या प्रजातीची नोंद सर्वप्रथम मालवणला झाली आहे. प्रथमदर्शनी त्याच्या स्थलांतरामागची कारणे नैसर्गिक वाटत नाहीत. मोठ-मोठी जहाजे एका देशातून दुसऱया देशात ये-जा करताहेत. या जहाजांमध्ये जेव्हा समुद्राचे पाणी घेतले जाते आणि सोडले जाते, तेव्हा ते अपघाताने भारतीय समुद्रात आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज सीएमएफआरआयच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र, जहाजांच्या माध्यमातून अनैसर्गिकरित्या महाकाय जेलिफिश भारतात आलेत, असे वाटत नाही. पाण्याच्या प्रवाहाबरोबर किंवा खाद्याच्या शोधात ते येत असावेत, असे स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे आहे.
नमुन्यांचे संवर्धन करायला सांगितले
सीएमएफआरआयच्या शास्त्रज्ञांनी या महाकाय जेलिफिशचे काही नमुने शास्त्राsक्त पद्धतीने जतन करून ठेवण्याचे आवाहन स्थानिक मच्छीमारांना केले होते. त्याला मच्छीमारांनी प्रतिसाद देत एका बरणीमध्ये जेलिफिशचे नमुने जतन केले. मंगळवारी सीएमएफआरआयच्या टीमकडे हे नमुने सुपुर्द करण्यात आले. आता लवकरच या नमुन्यांच्या आधारे महाकाय जेलिफिशवर संशोधन केले जाणार आहे. संशोधनाअंती कोणती माहिती समोर येते, याची मच्छीमारांना उत्सुकता आहे.