काही भागात दुकाने सुरू तर काही भागात दुकाने बंद करण्यासाठी दमदाटी
प्रतिनिधी / बेळगाव
क्लोजडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंसाठी काही ठरावीक दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये बांधकाम क्षेत्रातील कामगारांनाही कामावर जाण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, सर्वांना सारखा नियम असताना महानगरपालिकेचे अधिकारी काही दुकानदारांना सापत्नभावाने वागवत आहेत. त्यामुळे दुकानदारांमध्ये नाराजी पसरली आहे.
बांधकाम व संबंधित आस्थापने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, हार्डवेअर, प्लायवूड, प्लंबिंग अशा दुकानांनाही परवानगी देणे आवश्यक आहे. प्रशासनाने दिलेल्या वेळेतच दुकानदारांनी दुकाने सुरू केली तरी खासबाग, वडगाव भागात ही दुकाने बंद करण्याबाबत सक्ती करण्यात येत आहे. अधिकारी पोलिसांसह येऊन दमदाटी करत आहेत. यामुळे दुकानदारांना नाहक त्रास होत आहे. क्लोजडाऊन असल्यास सर्वांना सारखा नियम लावावा, अन्यथा कोविड-19 च्या नियमांचे पालन करून जी दुकाने उघडी आहेत त्यांच्यावरच सक्ती करणे चुकीचे आहे, असे दुकानदारांचे म्हणणे आहे. दुकानांत ग्राहक नसूनही आपले काम करत असणाऱया दुकान चालकांवर आणि सर्व नियमांचे पालन करून दुकानात आलेल्या एखाद् दुसऱया ग्राहकावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मात्र, त्याचवेळी गर्दी असूनसुद्धा काही ठिकाणी हेतुतः दुर्लक्ष केले जात आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱयांचा सापत्नभाव नेमका कोणासाठी आहे? असा प्रश्न दुकानदार करत
आहेत. ज्या क्षेत्रांना खुले राहण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यांच्याकडून नियमांचे पालन होते की नाही हे पाहणे आवश्यक आहे. पण तसे न करता पोलिसांच्या साहाय्याने दुकानदारांवर दडपशाही करणे चुकीचे असून महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱयांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी संबंधित दुकानदार करत आहेत.