जीपीएस नकाशाप्रमाणे मोजमाप करून फलक लावण्याचा प्रस्ताव, सीटी सर्व्हे कार्यालयाला पत्र
प्रतिनिधी / बेळगाव
शहराच्या सभोवती कॅन्टोन्मेंट व ग्रामपंचायतीची हद्द सुरू होते. मात्र महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीची माहिती नागरिकांना नसल्याने समस्यांबाबत मनपाकडे तक्रारी करण्यात येतात. त्यामुळे जीपीएस नकाशाप्रमाणे मोजमाप करून महापालिकेच्या हद्दीवर फलक लावण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे.
महापालिकेने अलिकडेच जीपेएस नकाशाकरिता प्रस्ताव तयार केला आहे. पण नकाशा तयार करताना मनपा हद्दीबाबत अडचणी निर्माण झाल्या. ग्रामपंचायत हद्द व महापालिकेच्या हद्दीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे मनपा हद्दीची ओळख ठेवण्यासाठी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महापालिकेच्या सभोवती कॅन्टोन्मेंट बोर्ड, लष्करी, वनखाते आणि ग्रामपंचायतीची हद्द येते. शहराच्या मध्यवर्ती भागातदेखील कॅन्टोन्मेंट बोर्डची हद्द असून महापालिका व कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे शहरात निर्माण होणाऱया समस्यांबाबत मनपाकडे तक्रारी करण्यात येतात. ग्राम पंचायत हद्दीत येणाऱया परिसरातील तक्रारी देखील मनपाकडे करण्यात येतात. त्यामुळे समस्यांचे निवारण करताना महापालिकेला अडचणी निर्माण होतात. महापालिका हद्द निश्चित करून त्याठिकाणी फलक लावणे आवश्यक आहे. पण हद्द कुठे आहे, याची माहिती मनपा अधिकाऱयांनाच नसते. त्यामुळे घरपट्टी वसुली करताना किंवा महापालिकेच्या अन्य कामांवेळी अडचणी येत असल्यामुळे जीपीएस नकाशानुसार महापालिकेची हद्द निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या जीपीएस नकाशानुसार महापालिकेची हद्द निश्चित करण्यासाठी विभागिय आयुक्तांनी सीटी सर्व्हे कार्यालयाला पत्र दिले असल्याची माहिती उपलब्ध आहे. हद्द निश्चिती करून महापालिकेच्या हद्दीवर फलक लावण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवर तसेच आवश्यक ठिकाणी हद्दीबाबतचे फलक लावण्यात येणार आहेत.