ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे महापालिका हद्दीत 23 गावांचा समावेश करण्यासाठी संबंधित गावातील ग्रामस्थांच्या भूमिकेबरोबर भारतीय जनता पक्ष राहील असे ठाम मत शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.
महापालिकेत समावेश करायच्या प्रस्तावित 23 गावांतील ग्रामस्थांची याबाबतची भूमिका, नागरी समस्या आणि विकासकामांची माहिती घेण्यासाठी मुळीक यांनी शेवाळेवाडी येथून दौरा सुरू केला. पुढील 15 दिवसांमध्ये सर्व 23 गावांना भेट देऊन संवाद साधण्यात येणार आहे.
मुळीक म्हणाले, ’23 गावांच्या समावेशाबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता असूनही सर्वच गावे विकासापासून वंचित राहिली आहे. आपले अपयश लपविण्यासाठी राष्ट्रवादी महापालिकेत समवेशासाठी आग्रही आहे. मात्र उर्वरित घटक पक्ष या भूमिकेशी सहमत दिसत नाहीत.’
कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता गावांना नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. विकासासाठी आम्ही ग्रामस्थांबरोबर राहणार आहोत, असेही मुळीक यांनी सांगितले.
संघटनात्मक बांधणी करण्यासाठी या दौऱ्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात येत असून, संघटना सक्षम करण्यावर भर देत असल्याचे ही मुळीक यांनी सांगितले.