महाड/प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत, ‘तुम्ही दुःखातून सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ’ अशी ग्वाही दिली. तसेच, डोंगर उतारावरील सर्व वस्त्यांचे पुनर्वसन केले जाणार असून आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान कोकणासह राज्यातील विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. ही पूरस्थिती रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. पुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाडच्या तळीये गावात जाऊन दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी केली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. त्याचे प्रमाण आणि परिणाम आपण ठरवू शकत नाही. कुणीही ढगफुटीचा अंदाज वर्तवू शकत नाही. कोल्हापूर आणि सांगलीसह कोकणातही जोरदार पाऊस पडत असतो. त्यामुळे आम्ही वॉटर मॅनेजमेंट करणार आहोत. जल आराखडा तायर करणार आहोत. अचानक पुराचं पाणी वाढतं आणि होत्याचं नव्हतं होतं. त्यामुळेच हा जल आराखडा तयार करणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.