अभिनेते प्रवीण कुमार सोबतींचे दिल्लीत निधन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात सर्वात चर्चेत राहिलेली मालिका ‘महाभारत’मध्ये काम करणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाच्या धक्क्याने प्रवीण कुमार यांनी दिल्लीतील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे.
बी.आर. चोप्रा दिग्दर्शित महाभारत मालिकेत ‘भीम’ ही व्यक्तिरेखा साकारणाऱया प्रवीण कुमार सोबती यांचा चेहरा आणि नाव 90 च्या दशकात घरोघरी माहित होते. याचबरोबर त्यांनी सुमारे 50 चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेता म्हणून काम केले. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘शहंशाह’ चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका चर्चेत राहणारी आहे.
अभिनयानंतर प्रवीण कुमार सोबती यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी आम आदमी पक्षाच्या तिकीटावर दिल्लीच्या वजीरपूरमधून निवडणूक लढविली, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. काही महिन्यांनी त्यांनी आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
6 डिसेंबर 1947 रोजी जन्मलेले प्रवीण कुमार सोबती यांनी आशियाई क्रीडास्पर्धेत भारतासाठी 4 पदके मिळविली होती. यात 2 सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य पदक सामील होते. 6 फूटांपेक्षा अधिक उंची असणारे प्रवीण कुमार हे 1960 आणि 1970 मध्ये आघाडीचे भारतीय ऍथलिट होते. आशियाई क्रीडास्पर्धेत थाळीपेकमध्ये त्यांनी सुवर्णपदकही मिळविले होते.