जिम अन् स्वीमिंग पूल बंद करण्याचा पुन्हा निर्णय : जगभरात आतापर्यंत 30,80,101 कोरोनाबाधित
जगात कोरोनाचा संसर्ग आतापर्यंत 30 लाख 80 हजार 101 जणांना झाला आहे. तर कोरोनामुळे 2 लाख 12 हजार 265 जणांना जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 9 लाख 29 हजार 077 जणांनी कोरोनावर मात केली आहे. चीनने महामारीच्या दुसऱया लाटेच्या भीतीमुळे जिम आणि व्यायामशाळा पुन्हा बंद केल्या आहेत. चीनमध्ये जानेवारीमध्ये जिम बंद करण्यात आल्या होत्या, परंतु काही आठवडय़ांपूर्वी त्यांना अनुमती देण्यात आली होती. चीनमध्ये विदेशातून येणाऱया नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसून येत आहे. याच कारणामुळे बीजिंगमध्ये येणाऱया कुठल्याही व्यक्तीला सरकारने निश्चित केलेल्या हॉटेल्समध्ये 14 दिवसांपर्यंत क्वारंटाईन केले जात आहे. तर सिंगापूरमध्ये महामारी दुसऱया टप्प्यात पोहोचली आहे. तेथील रुग्णांची संख्या 14 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. बहुतांश रुग्ण हे विदेशातून आलेले कामगार असल्याचे आढळले आहे.
अमेरिकेत 24 तासांत 1303 बळी
अमेरिकेत 24 तासांमध्ये 1,303 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण बळींचा आकडा 56,803 वर पोहोचला आहे. तर देशातील रुग्णांची संख्या 10,10,507 झाली आहे. न्यूयॉर्क प्रांतात 2 लाख 98 हजार बाधित असून 22 हजार 623 जणांना जीव गमवावा लागला आहे. काँग्रेसच्या समितीने ट्रम्प यांच्या जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याच्या निर्णयाची चौकशी सुरू केली आहे.
चीनकडून नुकसानभरपाई मागणार
कोरोनाचा जगभरात फैलाव होण्यापूर्वीच हा संसर्ग चीन रोखू शकला असता. चीनच्या भूमिकेची अमेरिकेचे प्रशासन गांभीर्याने चौकशी करत आहे. याप्रकरणी चीनकडून अमेरिका नुकसान भरपाईची मागणी करू शकते. जर्मनीने 165 अब्ज डॉलर्सची नुकसान भरपाई चीनकडून मागितली आहे. पण अमेरिका त्याहून अधिक रक्कम मागणार असल्याचे उद्गार अध्यक्ष ट्रम्प यांनी काढले आहेत.
अर्जेंटीनात विमानोड्डाणांवर बंदी
दक्षिण अमेरिका खंडातील अर्जेंटीना या देशाने प्रवासी विमानोड्डाणांच्या तिकीट विक्रीवर सप्टेंबरपर्यंत बंदी घातली आहे. मार्चपासूनच देशाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अर्जेंटीनाच्या सीमा 15 मार्चपासून बंद असून तेथे येणाऱया तसेच तेथून जाणाऱया सर्व विमानोड्डाणांना रोखण्यात आले आहे. इक्वेडोर, पेरू आणि कोलंबिया समवेत अनेक दक्षिण अमेरिकन देशांनीही विमानोड्डाणांवर बंदी घातली आहे.
इटलीत 26 हजार 977 बळी
इटलीतील कोरोनाबळींचा आकडा आता 26 हजार 977 झाला आहे. तर बाधितांची संख्या 1,99,414 वर पोहोचली आहे. जगात अमेरिकेनंतर इटलीतच सर्वाधिक बळी गेले आहेत. मागील 24 तासांत 333 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी 1 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. 4 मेपासून टाळेबंदी शिथिल करण्याची योजना सरकार आखत आहे.
न्यूझीलंडमध्ये दोन नवे रुग्ण
न्यूझीलंडमध्ये दोन नवे बाधित सापडल्याने रुग्णांची एकूण संख्या 1,472 झाली आहे. न्यूझीलंडने महामारीसंबंधीचा इशारा आता 4 वरून 3 पातळीवर आणला आहे. 11 मे रोजी आढावा घेतल्यावरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली आहे. न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 19 जणांना जीव गमवावा लागला आहे.
सिंधचे गव्हर्नर कोरोना पॉझिटिव्ह
पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे गव्हर्नर इम्रान इस्माइन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. इस्माइन यांना पंतप्रधान इम्रान खान यांचे घनिष्ठ सहकारी मानले जाते. महामारीच्या विरोधात लढण्याचे बळ मिळावे असा ट्विट इस्माइन यांनी सोमवारी रात्री केला आहे. सिंधमध्ये 4,956 कोरोनाबाधित सापडले आहेत. तसेच तेथील 6 निरीक्षकांसह 50 पोलीस कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे.
फ्रान्समध्ये 23 हजारांपेक्षा अधिक बळी
फ्रान्समध्ये कोरोनामुळे जीव गमाविणाऱयांची संख्या 23,293 झाली आहे. मागील 24 तासांत 437 जणांना जीव गमवावा लागला असून 3764 नवे रुग्ण सापडले आहेत. तर फ्रान्समध्ये 45 हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात मागील 2 आठवडय़ांपासून बळी तसेच नव्या रुग्णांची संख्या घटू लागली आहे. फ्रान्समध्ये 17 मार्चपासून टाळेबंदी लागू आहे.
चीनमध्ये 6 नवे बाधित
बीजिंगमध्ये विद्यापीठ परिक्षांच्या तयारीसाठी शाळेत जाण्याची अनुमती मुलांना मिळाली आहे. शांघायमध्ये माध्यमिक तसेच प्राथमिक शाळा सुरू झाल्या आहेत. वुहानमध्ये 6 मेपासून शाळा सुरू होणार आहेत. तर चीनमध्ये दिवसभरात 6 नवे रुग्ण सापडले असून यातील 3 जण विदेशातून आलेले नागरिक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर अन्य 3 रुग्ण हेइलोंगजियांग प्रांताचे आहेत. सोमवारी देशात एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. चीनमध्ये आतापर्यंत 82 हजार 836 जणांना कोरोनाची लागण झाली असून 4,633 जणांचा बळी गेला आहे.
इस्रायल : 3 मेपासून शाळा सुरू होणार
इस्रायल सरकारने 3 मेपासून कालबद्ध पद्धतीने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात किंडरगार्डन आणि इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू केले जातील. वर्ग छोटय़ा समुहांमध्ये आयोजित केले जातील. स्वच्छतेबरोबरच मुलांमध्ये शारीरिक अंतर राखण्याकडे शाळांमध्ये विशेष लक्ष दिले जाणार आहे. इस्रायलमध्ये मागील 24 तासांत 112 नवे बाधित सापडले आहेत. तर एकूण रुग्णांची संख्या वाढून 15 हजार 555 झाली आहे.
तुर्कस्तानात 1.12 लाखांपेक्षा अधिक
तुर्कस्तानात कोरोनाबाधितांचे प्रमाण आता 1,12,261 वर पोहोचले आहे. देशात कोरोनामुळे 2,900 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत तुर्कस्तानात 95 जणांचा बळी गेला असून 2,100 नवे रुग्ण सापडले आहेत. तुर्कस्तानसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे संसर्गातून 33 हजार 791 लोक बरे झाले आहेत. पश्चिम आशियात तुर्कस्तानातच सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.
नॉर्वे : महामारी नियंत्रणात
महामारी नियंत्रणात असल्याचा दावा नॉर्वेने केला आहे. 26 एप्रिल रोजी नॉर्वेमधील प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु सरकारच्या या निर्णयावर काही पालकांनी चिंताही व्यक्त केली आहे. तर वर्गात केवळ 15 विद्यार्थीच बसू शकणार आहेत. लोकांना सोशल डिस्टंन्सिंगचे पालन तसेच स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.