बाहेर पडण्यापूर्वीच पूर्ण नियोजन करा : योग्य खबरदारी घेणे गरजेचे
जगभरात महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध आता शिथिल केले जात आहेत. रेल्वे, रस्ते, विमानप्रवास देखील लोकांना करता येणार आहे. तर काही जण स्वतःची कार किंवा दुचाकीनेच प्रवास करत आहेत. कोरोना विषाणूला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी अनेक जण सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर टाळत आहेत. घराबाहेर पडून प्रवास करणार असाल तर पूर्णपणे जोखीम संपविता येणार नाही, परंतु योग्य खबरदारीसह प्रवास करणे उत्तम असे उद्गार कोलंबियाच्या मेलमॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील साथरोग विभागाच्या प्राध्यापिका सँड्रा एल्बॅक्ट यांनी काढले आहेत.
प्रवासाचा आवश्यक टप्पा : पेट्रोल पंप
रस्त्यावरील प्रवासादरम्यान पेट्रोल पंप टाळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, परंतु यातही चिंतित होण्याची काही कारणे आहेत. फोमाइट ट्रांसमिशन किंवा पृष्ठभागाद्वारे कोरोना फैलावाची शक्यता खूपच कमी आहे. पृष्ठभाग साफ करण्यासाठी काहीच नसल्यास इंधन भरल्यावर हँड सॅनिटायजरचा वापर अवश्य करा असे डॉक्टर सँड्रा यांनी सुचविले आहे.
मास्क वापरा
पेट्रोल पंप खुल्या जागेत असले तरीही त्यांच्या रचनेमुळे आरोग्यतज्ञ मास्क वापरण्याचा सल्ला देतात. कधीकधी इंधन भरण्यास खूप वेळ लागू शकतो. अशा वेळी तुम्ही अनोळखी व्यक्तीच्या सान्निध्यात असल्याने मास्कचा वापर योग्य ठरतो असे सँड्रा यांनी म्हटले आहे.
खुल्या जागेत खाणे सुरक्षित
बंदिस्त जागेऐवजी खुल्या रेस्टॉरंटमध्ये खाणे अधिक सुरक्षित आहे. प्रवासात भोजन करावेच लागते. ज्या ठिकाणी तुम्ही थांबलात तेथेच भोजन करणे अधिक चांगले ठरणार असल्याचे हॉवर्डच्या टीएच चेन स्कुल ऑफ पब्लिकन हेल्थमधील इम्युनोलॉजी विभाग आणि इन्फेक्शियस डिसिजच्या प्रमुख सारा फॉरच्यून यांनी स्वतःच्या प्रवासाचा अनुभव सांगताना हा सल्ला दिला आहे.
सुरक्षितेतबद्दल विचारणा
हॉटेलमध्ये सफाईवरून प्रश्न विचारणे चांगला उपाय आहे खोली किती दिवसांपासून रिक्त आहे याची माहिती घ्या. विषाणू किती वेळ हवेत तरंगतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. परंतु तीन दिवसांचा कालावधी गृहित धरला जात आहे. हॉटेलच्या कर्मचाऱयाने प्रश्नांची उत्तरे टाळल्यास तो धोक्याचा संकेत ठरणार आहे. कमी गर्दी असलेल्या वेळेत हॉटेलमध्ये चेक इन किंवा चेक आउट करा, यामुळे कमी लोकांच्या संपर्कात याल असे सँड्रा यांनी म्हटले आहे.
स्वच्छतागृहाचा वापर
वाटेत स्वच्छतागृहात जाण्याची गरज भासल्यास टाळाटाळ करू नको. रेस्टॉरंट, पेट्रोलपंप अशा ठिकाणी स्वच्छतागृहांची निगा चांगल्याप्रकारे ठेवली जाते. स्वच्छतागृहात जाण्यापूर्वी आणि त्यातून बाहेर पडल्यावर हात धुवून घ्या. परंतु अखेरीस जोखीम पत्करण्याच्या शक्तीवर हे सर्व काही अवलंबून आहे. सर्वच ठिकाणी स्वतःचे स्वच्छतागृह नेता येणार नाही असे डॉक्टर फॉरच्यून यांनी म्हटले आहे.
2021च्या दरम्यान सर्व देशांपर्यंत पोहोचणार लस
जगभरात कोरोना विषाणूची बाधा आतापर्यंत 2 कोटी 67 लाख 75 हजार 48 जणांना झाली आहे. यातील 1 कोटी 88 लाख 84 हजार 512 रुग्ण बरे झाले आहेत. तर 8 लाख 78 हजार 150 बाधित दगावले आहेत. 2021 च्या मध्यापर्यंत कोरोनावरील लस जगभरात पोहोचविली जाऊ शकते असे उद्गार जागतिक आरोग्य संघटनेने काढले आहेत. डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी एका पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे. 2021 च्या दुसऱया किंवा तिसऱया तिमाहीपर्यंत जगभरातील देशांमध्ये लस पोहोचू शकते जगभरातील ज्या लसींची तिसऱया टप्प्यातील चाचणी सुरू असून ती चालू वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची चिन्हे नाहीत. चाचणी पूर्ण झाल्यावरच लसीचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करता येणार असल्याचे त्या म्हणाल्या.
माजी पंतप्रधानाचा मृत्यू
दक्षिण प्रशांत महासागरातील कुक आयलँड या देशाचे माजी पंतप्रधान जोसेफ विलियम्स यांचा कोरोना महामारीमुळे मृत्यू झाला आहे. ते सद्यकाळात न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये होते आणि एक डॉक्टर म्हणून स्वतःचे कर्तव्य पार पाडत होते. न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 1,767 रुग्ण सापडले असून 24 जणांचा मृत्यू ओढवला आहे.
प्रभावी लसीसाठी योजना
कोरोना विषाणूवरील लस विकसित करणे आणि जागतिक स्तरावर एक प्रभावी आणि सुरक्षित लस वेळेत पोहोचविण्यासाठी जागतिक प्रयत्नांवर देखरेख करण्यासह पावलेही उचलत असल्याचे सिंगापूरचे आरोग्यमंत्री किम योंग यांनी संसदेत सांगितले आहे. अतिजोखीम असलेल्या लोकांचे रक्षण करणे हाच सिंगापूरचा दृष्टीकोन असल्याचे ते म्हणाले. काही आठवडय़ांपूर्वी संसर्गमुक्त झालेल्या डॉर्मिटरीजमध्ये पुन्हा रुग्ण सापडू लागले आहेत.
अल्पसंख्याक अन् चाचणी
लसीच्या तिसऱया टप्प्यातील चाचणीत पुरेशा प्रमाणात अन्य वंशीय म्हणजेच अल्पसंख्याक सामील नसल्याचे अमेरिकेचे साथरोगतज्ञ डॉ. अँथनी फॉसी यांनी म्हटले आहे. मॉडर्ना आणि फायजरने चाचणीत 37 टक्के दक्षिण अमेरिकन आणि 27 टक्के बिगरश्वेतवर्णीय सामील करावेत. सद्यकाळात मॉडर्नाच्या चाचणीत 16 टक्के दक्षिण अमेरिकन आणि 8 टक्के बिगरश्वेतवर्णीय आहेत. अशाच प्रकारे फायजरच्या चाचणीत 11 टक्के दक्षिण अमेरिकन आणि 8 टक्के बिगरश्वेतवर्णीय सामील आहेत. चाचणीत अन्य वंशीयांना सामील करण्यात आल्याने लसीचा सर्वोत्तम परिणाम समजू शकतो असे फॉसी म्हणाले. .
लसीचे 60 टक्के उत्पादन भारतात
कोरोनावरील लसीच्या उत्पादनात भारताची मदत घेणार असल्याचे विधान रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरील दिमित्रीव यांनी केले आहे. कोरोनावरील स्पुतनिक 5 लसीच्या स्थानिक उत्पादनासाठी संबंधित मंत्रालये, भारत आणि सरकार आणि मोठय़ा उत्पादकांशी चर्चा सुरू आहे. भारताची क्षमता आम्ही ओळखतो, भारत स्वतःसह अन्य देशांसाठीही सल निर्माण करण्याची क्षमता बाळगून असल्याचे ते म्हणाले.
ऑनलाईन क्लासदरम्यान मृत्यू
झूम या ऍपवरून ऑनलाईन क्लास घेतानाच एका प्राध्यापिकेची प्रकृती बिघडून मृत्यू झाला आहे. प्राध्यापिका मागील अनेक आठवडय़ांपासून कोरोना संसर्गाशी झुंज देत होती. प्राध्यापिकेची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आल्यावर विद्यार्थ्यांनी रुग्णवाहिका पाठविण्यासाठी घरचा पत्ता विचारला, परंतु त्यांना तो सांगता आला नाही. अर्जेंटीना ही घटना घडली आहे. पाओला डी सिमोने असे या दुर्दैवी प्राध्यापिकेचे नाव आहे. त्या 46 वर्षांच्या होत्या. 4 आठवडय़ांनंतरही त्यांचा कोरोना संसर्ग दूर झाला नव्हता.