वार्ताहर/ वाठार
कराड तालुक्यातील वाठार येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटय़ाचा मृत्यू झाला. महामार्ग ओलांडत असताना वाहनाने धडक दिली. यात अंतर्गत रक्तस्राव होऊन बिबटय़ाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी 26 रोजी पहाटे ही घटना उघडकीस आली. स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वाठारजवळ पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दक्षिण मांड नदीनजीक एका बिबटय़ाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. रविवारी 26 रोजी पहाटे सुमारे 6 वाजता ही घटना घडल्याचे उघडकीस आली. वनविभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पंचनामा करून बिबटय़ास शवविच्छेदनासाठी कराड पशुसंवर्धन दवाखान्यात आणण्यात आले. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बोरडे व त्यांच्या सहकाऱयांनी शवविच्छेदन केले. बिबटय़ाच्या डाव्या बाजूच्या शरीरावर अज्ञात वाहनाची जोरात धडक बसली. यात मोठय़ा प्रमाणावर अंतर्गत रक्तस्त्राव झाला असल्याचे शवविच्छेदनामध्ये स्पष्ट झाले. तर बिबटय़ाचे सर्व अवयव, मिशा, सर्व नखे, सर्व दात सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले.
साहायक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रोहन भाटे, वनपाल सावखंडे, वनपाल बाबुराव कदम, वनरक्षक अरुण सोळंकी, रमेश जाधवर, अश्विन पाटील आदी वन कर्मचाऱयांच्या उपस्थितीत बिबटय़ावर वनविभागाच्या हद्दीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अज्ञात वाहनाचा तपास सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी नांदलापूर येथे महामार्गावर बिबटय़ा वावरत असल्याचे काही वाहनधारकांनी पाहिले होते.
बिबटय़ा पूर्ण वाढ झालेला
मृत बिबटय़ाः हा पूर्ण वाढ झालेला नर होता. त्याचे वजन साधारण 45 किलो होते. वय अंदाजे 4.5 ते 5 वर्षे होते. या बिबटय़ाची नखे व सर्व अवयव सुस्थितीत होते.