प्रतिनिधी/ रत्नागिरी
महाराष्ट्र शासनाच्या राज्य पर्यटन मंडळाअंतर्गत ‘महाराष्ट्राचा मास्टरशेफ’ स्पर्धेत रत्नागिरीतील झरेवाडी येथील गिरीश शितप यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. कोकणातील गावांमधील पारंपरिक ‘पानगा’ पाककृती त्यांनी सादर केली होती. ही पाककृती महाराष्ट्रातून सादर झालेल्या सर्व पाककृतींमध्ये अव्वल ठरली. याबद्दल शितप यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य पर्यटन मंडळांतर्गत महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची ओळख, इतिहास जपण्यासाठी महाराष्ट्राचा मास्टरशेफ ही स्पर्धा पारंपरिक महाराष्ट्रीयन पाककृतीवर आधारित घेण्यात आली होती. या स्पर्धेत हजारोंच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातून सहभाग नोंदवला होता. यामध्ये रत्नागिरीतील झरेवाडी गावचे रहिवासी गिरीश शितप आणि त्यांची टीम यांनी तळकोकणातील गावांमधील 50 ते 60 वर्ष जुनी, पौष्टिक, स्वास्थ पुरक, पारंपरिक ‘पानगा’ पाककृती क्रिएटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून सादर केली होती. या स्पर्धेमध्ये ही पाककृती सर्वोत्तम ठरली
‘रेडी टू कूक आणि फास्ट फूड’च्या आजच्या जमान्यात आपली पारंपरिक चव आणि खाद्यसंस्कृती लुप्त होत चालली आहे. हीच पारंपरिक चुलीवरची चव व ग्रामीण खाद्यसंस्कृती जपण्याचा प्रयत्न झरेवाडी ‘गावरान मसाला’ या दालनाच्या माध्यमातून गिरीश शितप आणि त्यांची टीम करत आहे. महाराष्ट्र शासनाची ही स्पर्धा जाहीर झाल्यानंतर आपल्या गावातला आणि कोकणातला अस्सल पारंपरिक अप्रतिम चवीचा ‘कोंबडी पानगा’ (हळद व कुंभया या वनस्पतींच्या पानांमधील रेसिपी) या स्पर्धेच्या माध्यमातून अधिकाधिक पर्यटक आणि लोकांपर्यंत पोहोचावा, या हेतूने शितप यांनी सहभाग नोंदवला होता. या पाककृतीला स्पर्धेच्या अव्वलस्थानी निवड करून गौरविण्यात आल.s याबद्दल गिरीश शितप यांनी समाधान व्यक्त केले व महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्राचा मास्टरशेफ’ या व्यासपीठाच्या माध्यमातून अशा पारंपरिक पाककृती जपण्याची व संवर्धनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या स्पर्धेत पाककृतीसोबत क्रिएटिव्ह व्हिडिओ सादर होणे अपेक्षित होते. पाककृतीचे क्रिएटिव्ह व सिनेमॅटिक व्हिडिओ बनवण्याचे संपूर्ण श्रेय रत्नागिरीतील छायाचित्रकार ज्ञानेश कांबळे आणि संकलनकार भूषण बागुल या उमद्या हरहुन्नरी युवकांना जाते. दर्जेदार फुटेज मिळवणे व तितक्याच उत्तम पद्धतीने संकलन करून ‘पानगा’ पाककृती अप्रतिम पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून स्पर्धेत सादर झाली. स्पर्धेतील सहभागासाठी ताराचंद ढोबळे व शेफ मेघना शेलार यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. या सर्वांच्या टीमवर्कमुळेच हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया गिरीश शितप यांनी व्यक्त केली.