ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत चालला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत विक्रमी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आता पुन्हा एकदा मिनी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यातच रविवारी तब्बल 57 हजार 074 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 222 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 30 लाख 10 हजार 597 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 55 हजार 878 एवढा आहे.
कालच्याा एका दिवसात 27,508 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 25 लाख 22 हजार 823 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 4 लाख 30 हजार 503 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.08 % तर मृत्युदर 1.86 % इतका आहे.
- मुंबईत कहर : 11,163 नवे रुग्ण
मुंबईत गेल्या 24 तासातील कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंताजनक आहे. कालच्या दिवसात आतापर्यंतची उच्चांकी संख्या आढळून आली. रविवारी 11,163 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 25 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 52 हजार 445 वर पोहचली आहे. त्यासोबतच कालच्या दिवसात 5,263 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. तर 3,71, 628 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,776 इतकी आहे. सद्य स्थितीत 68 हजार 052 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्य स्थितीत रुग्ण दुपटीचा कालावधी 42 दिवसांचा आहे.