ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील जनतेला आज पुन्हा एकदा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलासा दिला आहे. राज्यात आज पुन्हा एकदा कोरोना चाचणीचे दर कमी करण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
ते म्हणाले, राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहे.
त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही. 4500 रुपयांवरुन 980 रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच सर्व टेस्टिंग लॅबनी याची दखल घ्यावी आणि कमी करण्यात आलेले दर आकरावेत, अशी विनंती ही त्यांनी यावेळी केली आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात कोरोना चाचणीचे दर कमी करण्यात आले होते.