72 तासांपूर्वीचा आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल दाखविणे बंधनकारक
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यावर नियंत्रणासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्याच्या सीमेवर सतर्कता बाळगण्याची सूचना केली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याने या राज्यांमधून कर्नाटकात येणाऱयांना 72 तासांपूर्वी केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक असणार आहे. विमान, रेल्वे, बस किंवा खासगी वाहनातून प्रवास करणाऱयांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली असली तरी त्यांना राज्यात प्रवेश करण्याआधी चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे सक्तीचे आहे.
कोविड तांत्रिक सल्लागार समितीने दिलेल्या सल्ल्यानुसार राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने शनिवारी यासंबंधीची नवी मार्गसूची जारी केली आहे. देशात दररोज नोंद होत असलेल्या कोरोना रुग्णांपैकी निम्मे रुग्ण केरळ आणि महाराष्ट्र राज्यातील आहेत. त्यामुळे कर्नाटक सीमेवर खबरदारी घेण्यात येत असून चेकपोस्टवरील कर्मचाऱयांची संख्या वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्र सीमेवरील बिदर, गुलबर्गा, विजापूर, बेळगाव तसेच केरळ सीमेवरील कोडगू, म्हैसूर, मंगळूर जिल्हय़ांमध्ये चेकपोस्टची संख्या वाढवून खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
या दोन्ही राज्यांमधून बस किंवा रेल्वेने कर्नाटकात येणाऱया प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल तपासूनच तिकीट द्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. राज्यातही कोरोनाबाधितांची संख्या हळुहळू वाढत असल्याने राज्य सरकार सतर्क झाले आहे. गुरुवारी राज्यात 2,052, तर शनिवारी 1,987 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. हा आकडा मागील आठवडय़ात 1,300 च्या आसपास होता.
केरळमधून राज्यात शिक्षणासाठी दररोज ये-जा करणारे विद्यार्थी, व्यापारी व इतर व्यक्तींना किमान 15 दिवसांतून एकदा कोविड चाचणी करून त्याचा निगेटिव्ह अहवाल सादर करावा लागणार आहे.
तातडीच्या प्रसंगी सूट
वैद्यकीय कर्मचारी, संविधानिक कार्यांसाठी येणारे, दोन वर्षाखालील मुले यांना कोविड चाचणीच्या निगेटिव्ह अहवालापासून सूट देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केरळमधून तातडीच्या प्रसंगी म्हणजेच कुटुंबातील सदस्याचा मृत्यू, वैद्यकीय उपचार आदी कारणांसाठी कर्नाटकात येणाऱयांचे चेकपोस्टवरच स्वॅबचे नमुने जमा वले जमा करून संपूर्ण माहिती जमा केली जाईल, असा उल्लेख आरोग्य खात्याचे अप्पर मुख्य सचिव जावेद अख्तर यांनी जारी केलेल्या मार्गसूचीमध्ये आहे.