ऑनलाईन टीम / सातारा :
सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या चित्तथरारक लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरला पराभूत करून मानाची गदा पटकावली. पृथ्वीराजच्या विजयाने कोल्हापूरला 21 वर्षानंतर ही मानाची गदा मिळाली. पण या लढतीनंतर पृथ्वीराजला 1 रुपयाचेही बक्षीस दिले नसल्याची खंत पृथ्वीराजने बोलून दाखवली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे वृत्त व्हायरल होताच पृथ्वीराजवर बक्षिसांची खैरात सुरू झाली आहे.
भाजपने पृथ्वीराज पाटीलला 5 लाखाचे बक्षीस जाहीर केलं आहे. भाजपकडून त्याचा सत्कार करण्यात येणार असून, त्याला पुढील सरावासाठी पाच लाखांचे बक्षीस देण्यात येईल, असे विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच सातारा-जावलीचे आमदार व अजिंक्य उद्योगसमुहाचे प्रमुख शिवेंद्रराजे भोसले यांनी पृथ्वीराजला सातारा-जावलीकरांच्यावतीने 5 लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर केली आहे.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही शिवाजीराव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पृथ्वीराज पाटीलला 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशिल मोझर यांच्याकडून 1.51 लाख रोख रक्कम आज कोल्हापूर येथे पृथ्वीराज पाटीलला बक्षीस स्वरूपात सूपूर्त करण्यात येणार आहे.
तर श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज तालीम संघातर्फे पृथ्वीराज पाटीलला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बुलेट देण्यात येणार आहे.