ऑनलाईन टीम / मुंबई :
महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी काही संपण्याचं नाव घेत नाहीत. आता काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याचं समजते आहे. संबंधित मंत्र्यांना न विचारता अधिकारी प्रस्ताव मंजुरीसाठी देत असल्याने अशोक चव्हाण नाराज आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य मंडळाची काल बैठक झाली. या बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र तो अशोक चव्हाण यानांच माहीत नव्हता. आपल्याला माहिती न देता, अधिकाऱ्यांनी असा प्रस्ताव तयार करून थेट मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जातो, हे अत्यंत असमन्वयाचे आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
अधिकारी परस्पर प्रस्ताव देत असून संबंधित मंत्र्यांनाच गृहीत धरले जात आहेे, हे चुकीचे आहे अशी भावना अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या. याआधी देखील ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही असे म्हणत, अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती.